अन् विलासराव देशमुखांच्या आठवणीने रितेशचा कंठ दाटला… | पुढारी

अन् विलासराव देशमुखांच्या आठवणीने रितेशचा कंठ दाटला...

लातूर, पुढारी वृतसेवा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे त्यांच्या मुलांवर आंतरिक प्रेम होते. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर अनेक प्रसंगात याची साक्ष त्यांच्या मुलांनी दिली आहे. आज (दि.१८) निवळी येथे विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना अभिनेते रितेश देशमुख यांना हुंदका दाटून आला. रितेशला गलबलून आल्याने उपस्थितांच्याही पापण्या ओलावल्या.

यावेळी रितेश म्हणाला, विलासरावांनी त्यांची वडीलकी कधीही आमच्यावर लादली नाही. जे आम्हाला करायचे होते ते करू दिले, आमच्यावर कोणताही दबाव टाकला नाही. मुलांनी भरारी घेताना त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या संस्कारात आम्ही वाढलो आणि घडलो, असेही रितेश म्हणाला.

पुढे बोलताना रितेश म्हणाला, भावा- भावातील नाते कसे असावे, याचे आदर्श उदाहरण म्हणजे विलासराव व दिलीपराव यांचे नाते आहे. या नात्याला कसल्याही स्वार्थाची बाधा नव्हती. वडिलांच्या निधनानंतर काका सदैव आमच्या पाठीशी उभे राहिले. काका आणि पुतण्याचे नाते कसे असावे, याचे उदाहरण या व्यासपीठावर असल्याचे त्याने उपस्थितांना सांगितले.

विलासरावांच्या आठवणींना उजाळा देताना रितेशला गलबलून आले. तो आपली आसवे रोखू शकला नाही. त्यानंतर अमित देशमुख उठले आणि त्यांनी रितेशच्या पाठीवर धीराचा हात देत भावा-भावावातील भावनिक नात्याचा देशमुख परिवारांचा वसा-वारसा कायम असल्याची साक्ष दिली. यावेळी वैशाली देशमुख आणि दिलीपराव देशमुख यांनाही आपली आसवे रोखता आली नाहीत.

निष्ठा ही विलासरावांची ओळख होती व त्यांनी ती कायम जपली. आजच्या राजकारणाचा भोवताल पहाता राजकारणाची पातळी किती प्रदुषित झाली आहे, कशी घसरली आहे, हे स्पष्ट होते. तथापि अशा काळातही सामान्य माणसाचा विश्वास संपादन करुन पुन्हा जुन्या निष्ठावान नेत्यांचे दिवस आणले पाहिजेत, ही जबाबादारी आता येथील नेत्यांची असल्याचेही त्याने यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा :

Back to top button