दौंडच्या वनपरिक्षेत्र आधिकारी कल्याणी गोडसे निलंबित | पुढारी

दौंडच्या वनपरिक्षेत्र आधिकारी कल्याणी गोडसे निलंबित

रावणगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील भीमा नदीकाठच्या राजेगाव, मलठण, नायगाव, वाटलुज येथे झालेल्या बेसुमार वृक्षतोड व कोळसा भट्टी प्रकरणी दौंडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते व सहाय्यक उपवनसंरक्षक दीपक पवार यांनी दिली. मुख्य वन संरक्षक पुणे यांच्याकडून सोमवारी( दि.१२) वरील निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती मोहिते व पवार यांनी दै.’ पुढारी’ प्रतिनिधीशी बोलताना दिली.
मागील महिन्यात भीमा नदी पट्ट्यातील चार गावांमध्ये कोळसा तस्करांनी बेसुमार वृक्षतोड केल्याने मलठण (ता.दौंड) ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने वन अधिकाऱ्यांनी करावाईस टाळाटाळ केल्याने वनपाल, वनरक्षक व तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या निलंबनाची मागणी केली होती.

यानंतर सहाय्यक उप वन संरक्षक दीपक पवार यांनी सदर गावांमध्ये येऊन पाहणी केल्यानंतर जागोजागी वृक्षतोड, माती उपसा तसेच कोळसा भट्ट्या आढळून आल्याने त्यांनी या बाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे दिल्यानंतर या पूर्वीच उपवनसंरक्षक महादेव मोहिते पुणे विभाग यांनी वनपाल रवींद्र मगर व वनरक्षक किरण कदम यांना निलंबित केल्याचे आदेश दिले होते. या बाबत दै. पुढारी ने सविस्तर वृत्त प्रकाशित केल्याने एकच खळबळ उडाली होती. या नंतरही मलठण ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती. वृक्षतोड प्रकरणी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशी दरम्यान तालुका मुख्य वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कल्याणी गोडसे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मुख्य वन संरक्षक पुणे यांनी त्यांचे अखेर निलंबन केले.

यापूर्वीही… 

राज्य सरकारच्या 33 कोटी वृक्ष लागवडीचा योजने १४ कोटी ६० लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मंगळवेढा येथील न्यायाधीश आर.एम देवरसी यांनी राज्याचे वन सचिव यांच्या सह १३ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये देखील मंगळवेढ्याच्या तत्कालीन वनाधिकारी म्हणून कल्याणी रामदास गोडसे यांना दोषी ठरण्यात आले होते.

राज्य सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणी यापूर्वी देखील राजेगाव येथील वृक्ष लागवडीत गैरप्रकार केला गेला होता. या प्रकरणी तत्कालीन वनपाल म्हात्रे व वनरक्षक नजन यांच्यावर वरिष्ठांनी निलंबनाची कारवाई केली होती.

Back to top button