दोन वेळा भाजपला आघाडी देणारा दौंड या वेळी चर्चेत | पुढारी

दोन वेळा भाजपला आघाडी देणारा दौंड या वेळी चर्चेत

दीपक देशमुख

यवत : लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या जिल्हाभरात जोरदार वाहू लागले असून, राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणार्‍या बारामती लोकसभा मतदारसंघात या वेळी आणखीच रोचक सामना पाहावा लागणार आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील बदलेली राजकीय परिस्थिती पाहता या वेळी थेट पवारांच्या घरातच आमने-सामने लोकसभेचा सामना रंगणार आहे.अशावेळी गेल्या दोन निवडणुकात भाजपला मताधिक्य देणारा दौंड विधानसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आहे.

या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार किंवा अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे निवडणूक रिंगणात असू शकतात अशी अटकळ बांधली जात असताना बारामती लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदार संघ नेमकी काय भूमिका बजावतात हे पाहणे आवश्यक आहे बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत दौंड विधानसभा मतदार चांगलाच चर्चेत राहिला आहे,2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी 25000 मतांची आघाडी दौंड विधानसभा मतदारसंघातून घेतली होती तर 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दौंडचे भाजपा आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी भाजपची उमेदवारी मिळवत 7000 मतांची आघाडी घेतली होती.

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत महायुती आणि भाजप उमेदवाराने दौंड विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता दौंडचे भाजपा आमदार राहुल कुल यांचे परंपरागत राजकीय विरोधक असणारे माजी आमदार रमेश थोरात हे यावेळी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवाराबरोबर असणार आहेत,कारण ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. अजित पवार यांचे ते निकटवर्तीयही आहेत. दौंड तालुक्यातील आजी माजी आमदार यामुळे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात दिसणार आहेत असे असले तरीही विधानसभा निवडणुकीत आपल्या नेत्याला थांबावे लागते की काय म्हणून

रमेश थोरात यांचे कार्यकर्ते नेमकी लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. थोरात यांना विधानसभा निवडणुकीत थांबावे लागणार असेल तर आपण लोकसभा निवडणुकीत कितीही परिश्रम घेतले तरी याचे श्रेय कुल यांना मिळणार असून आपण वेगळी भूमिका घ्यावी म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्याबरोबर जावे असे काही कार्यकर्ते खासगीत बोलताना दिसून येत आहेत तर भाजप आमदार राहुल कुल हे महायुतीच्या उमेदवाराचे प्रचार प्रमुख म्हणून दिसणार असणार आहेत.

या वेळी महायुतीचे उमेदवार कोणी का असेना परंतु महायुतीच्या उमेदवार बरोबर तालुक्यातील स्थानिक नेत्यांची मोठी फौज असणार आहे यात आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, रंजना कुल,भाजप जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे महानंदाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे,वीरधवल जगदाळे अशी मोठी फौज पाहायला मिळणार आहे,तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार्‍या सुप्रिया सुळे यांना मात्र स्थानिक मोठ्या नेत्यांच्या शिवाय आपली प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे सुळे यांच्याबरोबर माजी सभापती आप्पासाहेब पवार, कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष रामभाऊ टुले व नवखे कार्यकर्ते असणार आहेत.

निवडणूक काळात अजित पवार यांनी शरद पवार यांना सोडून मोठी चूक केली असल्याची भावना राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात असून याचा फायदा सुप्रिया सुळेंना मत स्वरूपात होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.सुप्रिया सुळे यांनी लोकसभा मतदारसंघात भरीव कामगिरी केली नसली तरी शरद पवारांबद्दल असणारे सहानुभूती दौंड विधानसभा मतदारसंघात देखील राहणार असून याचा फायदा सुळे यांना होऊ शकतो तर दुसरीकडे कुल आणि थोरात यांनी आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना महायुतीचे उमेदवाराचे काम करावेच लागेल अशा स्वरूपाची ताकीद दिली तर महायुतीचे उमेदवार दौंड विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी घेऊ शकतो.

2014 च्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहता महादेव जानकर यांच्याबरोबर कोणीही मोठा कार्यकर्ता नसतानादेखील त्यांनी दौंड विधानसभा मतदारसंघात मोदी लाटेत 25000 मतांची आघाडी घेतली होती हे विसरून चालणार नाही ज्याप्रमाणे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट तयार झाली होती त्याप्रमाणेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या बद्दल सहानुभूतीची लाट तयार होऊ शकते,तसे झाल्यास दौंडमधून सुळे आघाडीवर राहतील, असे सांगितले जाते.

दौंड विधानसभा मतदारसंघात शिंदे गट आणि काँग्रेस यांची फार मोठी ताकद नसल्याने शिंदे गट हा महायुतीच्या उमेदवार बरोबर जाईल तर काँग्रेस सुप्रिया सुळे यांच्या बरोबर दिसून येईल. एकंदरीतच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या बद्दल असणारी सहानभूती कामाला येते का महायुतीची एकजूट कामाला येते ते निवडणूक निकालानंतर समजेलच.

Back to top button