LokSabha Elections 2024 | साडेसोळाशे मतदार करणार टपाली मतदान | पुढारी

LokSabha Elections 2024 | साडेसोळाशे मतदार करणार टपाली मतदान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात पहिल्यांदाच 85 वर्षांवरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील एक हजार 675 मतदारांनी या सुविधेसाठी अर्ज केल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार टपाली मतदान करू इच्छिणार्‍या 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांनी 12 डी भरून घेण्यात आले होते.

तसेच, अधिसूचित अत्यावश्यक सेवेतील 12 डी अर्ज भरून दिलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांनाही ही सुविधा देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत मिळून 85 वर्षांवरील एक हजार 397 आणि 265 दिव्यांग मतदारांनी 12 डी अर्ज भरून दिला असून, त्यांना घरून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तर अत्यावश्यक सेवेतील 13 मतदारांनी 12 डी नमुना भरून सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्रात (पीव्हीसी) जाऊन टपाली मतदानाची इच्छा व्यक्त केली आहे.

85 वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांचे सर्वाधिक अर्ज पुण्यात

पुणे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 463 इतक्या 85 वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांनी टपाली मतदानाचे अर्ज भरून दिले आहेत. या मतदारसंघात 42 दिव्यांग मतदारांनी, बारामती लोकसभा मतदारसंघात 290 ज्येष्ठ मतदार, तर 91 दिव्यांग मतदारांनी 12 डी अर्ज भरून दिले आहेत. शिरूरमध्ये 391 ज्येष्ठ मतदार, 87 दिव्यांग मतदार आणि अत्यावश्यक सेवेतील 10 मतदारांनी 12 डी अर्ज भरून दिले आहेत. मावळ मतदारसंघात 85 वर्षांवरील 263 ज्येष्ठ मतदार, 45 दिव्यांग तर अत्यावश्यक सेवेतील तीन मतदारांनी टपाली मतदानाचे अर्ज भरून दिले आहेत.

घरी जाऊन मतपत्रिकेवर मत नोंदविले जाणार

संबंधित मतदारसंघातील मतदानाच्या दिवशी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन मतपत्रिकेवर मत नोंदवून घेण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील 12 डी अर्ज भरून दिलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांना त्या त्या मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या तारखांना सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्रात (पीव्हीसी) जाऊन टपाली मतदान करता येणार आहे.

हेही वाचा

Back to top button