लक्षवेधी संशाेधन..! : ७० हून अधिक प्रकारच्‍या कॅन्‍सरवर ‘हे’ एक औषध ठरु शकते प्रभावी | पुढारी

लक्षवेधी संशाेधन..! : ७० हून अधिक प्रकारच्‍या कॅन्‍सरवर 'हे' एक औषध ठरु शकते प्रभावी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कॅन्‍सर ( कर्करोग ) या आजाराची जगभरात प्रचंड दहशत आहे. हा शब्‍द मृत्‍यूशी समानार्थी असावा इतके त्‍याचे सर्वसामान्‍यांमध्‍ये भय आहे. मागील काही वर्षांमध्‍ये वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीमुळे कॅन्सरवर उपचार करणे काही प्रमाणात सोपे झाले असले तरी सर्वसामान्यांसाठी आजही ते आव्‍हानात्‍मक आहे. आता संशोधकांनी ७० हून अधिक प्रकराच्‍या कॅन्‍सरवरील उपचारात प्रभावी ठरणारे औषध विकसित केले आहे. या औषधावर कॅलिफोर्निया कॅन्सर सेंटर सिटी ऑफ होपने केलेल्या या संशाेधनाबाबतचा लेख ‘सेल केमिकल बायोलॉजी जर्नल’ मध्ये प्रकाशित झाला आहे. ( New Oral Cancer Treatment )

2019 च्या अहवालानुसार, भारतात १२ लाख नवीन कर्करोगाची प्रकरणे आणि 9.3 लाख मृत्यूची नोंद झाली हाेती. या आकडेवारीवरुन देशातील या राेगाची वाढती संख्‍या आपल्‍या लक्षात येते. तसेच मागील काही वर्षांमध्‍ये  या आजाराचा धोका वाढत असल्‍याचे चित्र आहे. पुरुषांमधील फुफ्फुस-प्रोस्टेट कर्करोग आणि स्त्रियांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ही सर्वात सामान्यपणे नोंदवलेली प्रकरणे आहेत. केमोथेरपीसारख्या उपचार पद्धती केवळ वेदनादायक नसतात तसेच हे उपचार खर्चिकही आहेत. आता नवीन औषध हे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मदत करू शकते, असा विश्‍वास संशोधकांनी व्‍यक्‍त केला आहे. कॅन्सरवर उपचार करण्याच्या दिशेने हे एक महत्त्‍वपूर्ण संशोधन मानले जात आहे. ( New Oral Cancer Treatment )

New Oral Cancer Treatment : तोंडावाटे देण्‍यात येणारे औषध ठरतंय प्रभावी

सेल केमिकल बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित अहवालामध्‍ये म्‍हटले आहे की, कॅन्‍सरवर तोंडावाटे देण्‍यात येणारे औषध कॅन्‍सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, विशेष म्‍हणजे औषधाचा मानवी शरीरातील निरोगी पेशींना कोणतेही नुकसान होत नाही. शास्त्रज्ञांनी म्‍हटलं आहे की, कॅन्‍सरच्‍या रुग्‍णांना तोंडा वाटे देण्‍यात येणार्‍या एका गोळीने केमोथेरपीचे तास आणि त्याचा त्रास कमी होऊ शकतो. सध्या या औषधाचा केवळ प्राण्यांवर आणि प्रयोगशाळेतील प्रयोगांमध्ये अभ्यास केला गेला आहे, परंतु त्याचे कोणतेही दुष्परिणाम आढळलेले नाहीत.

कॅन्‍सरच्‍या पेशी नष्ट करण्‍यास मदत

संशोधकांनी म्‍हटले आहे की, हे औषध शरीरातील कॅन्‍सरच्‍या पेशींचे चक्र खंडित करण्‍याचे काम करते. तसेच हे प्रायोगिक औषध कॅन्‍सर रुग्‍णांवर सुरु असणारे इतर उपचारांचा प्रभाव वाढविण्‍यासही मदत करते. आतार्पंत फक्त उंदीर आणि कुत्र्यांवर अभ्यास केला गेला आहे, ज्यामध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत. कॅलिफोर्निया कॅन्सर सेंटर सिटी ऑफ होपच्‍या प्रमुख संशोधकांचे म्हटलं आहे की, हे औषध कॅन्सरच्या उपचारात खूप उपयुक्त ठरू शकते. मात्र प्राण्यांवर केलेल्या अभ्यासाचे परिणाम कर्करोगाच्या रूग्णांच्या उपचारात नेहमीच यशस्वी ठरतात असे नाही, परंतु आतापर्यंतचे परिणाम खूपच आशावादी आहेत.

७० प्रकारच्या कॅन्‍सरवर प्रभावी

संशोधकांचे म्हणणे आहे की, आत्तापर्यंतच्या अभ्यासात स्तनाचा कर्करोग, लहान पेशींच्या फुफ्फुसाचा कर्करोग आणि न्यूरोब्लास्टोमा नावाच्या तंत्रिका पेशींमध्ये सुरू होणारा कर्करोग यांवर प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. एकंदरीत, संशोधकांनी 70 प्रकारच्या कर्करोगावर औषधाच्या प्रभावाचे परीक्षण केले आहे. त्यापैकी बहुतेकांमध्ये प्रभावी परिणाम आढळले आहेत. या औषधाने उंदरांमध्ये कर्करोगाच्या ट्यूमरसह कर्करोगाच्या पेशी प्रभावीपणे कमी केल्याचे संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे.

मानवांवरील औषध चाचणीचा पहिला टप्‍पा सुरु

या औषधाबाबत मानवांमध्ये क्लिनिकल चाचण्यांचा पहिला टप्पा सुरू आहे, असे संशोधकांनी स्‍पष्‍ट केले आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यात औषधाचे डोस आणि साइड इफेक्ट्स तपासले जातात. या टप्प्यावर दोन वर्षे संशोधन केले जाणार आहे. औषधाची पहिली गोळी (AOH1996) ऑक्टोबर 2022 मध्ये चाचणी दरम्यान एका रुग्णाला देण्यात आली. रुग्‍णांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास केला जात आहे. या औषधाचे मानवांमध्ये देखील चांगले परिणाम दिसून येतील. या उपचारांचा प्रभाव निश्चित करण्यासाठी भविष्यातील अधिक क्लिनिकल अभ्यास आवश्यक आहे. याचे परिणाम चांगले असतील तर हे औषध क्रांतिकारक परिणाम सिद्ध करेल, असा विश्‍वासही संशोधकांनी व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचा :

 

Back to top button