Cancer : कर्करोगावरील उपचारात रुद्राक्ष ठरू शकतात गुणकारी | पुढारी

Cancer : कर्करोगावरील उपचारात रुद्राक्ष ठरू शकतात गुणकारी

मेरठ : भारतीय संस्कृतीमध्ये रुद्राक्षाचे महात्म्य मोठेच आहे. शिवपूजनामध्ये रुद्राक्षाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. रुद्राच्या म्हणजेच शिवाच्या अश्रूपासून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली असे आपल्याकडे मानले जाते. रुद्राक्षाचे एकमुखी, द्विमुखी असे अनेक प्रकार आहेत.

रुद्राक्षाची माळ शरीरावर धारण केली जाते तसेच जपासाठीही तिचा वापर होत असतो. या रुद्राक्षांचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो असे प्राचीन काळापासूनच मानले जाते. आता त्यावर काही भारतीय संशोधकांनी संशोधन केले आहे. कर्करोगावरील उपचारात रुद्राक्ष उपयुक्त ठरू शकतात असे त्यांनी म्हटले आहे. याबाबतच्या उंदरांवरील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. आता उत्तर प्रदेशातील मेरठच्या शोभित विश्वविद्यालयामधील या संशोधकांनी मानवावरील चाचण्यांसाठी बनारस हिंदू विश्वविद्यालयाशी करार करण्याची तयारी केली आहे.

संशोधकांचा दावा आहे की रुद्राक्षात इलेक्ट्रो मॅग्नेटिक एनर्जीबरोबर (विद्युत चुंबकीय ऊर्जा) फायटो केमिकल्स (अल्कलाईड, फिनोलिक व फ्लेवेनोइडस्) हे सुद्धा असतात. फायटो केमिकल्सचा परिणाम केमोथेरपी (सिस्प्लॅटिन) प्रमाणे होतो. केमोथेरपीचे अनेक साईड इफेक्टस् असतात, मात्र रुद्राक्षातील फायटो केमिकल्सचा कोणताही साईड इफेक्ट नसतो. शोभित विश्वविद्यालयाचे डॉ. शिवा शर्मा, डॉ. मनीषा शर्मा आणि संशोधक विद्यार्थी मिलिन सागर आणि प्रशांत पांडे यांनी रुद्राक्षावर हे संशोधन केले आहे. त्यामधून रुद्राक्षांचा कर्करोगावरील उपचारात प्रयोग करण्याबाबत बरेच सकारात्मक परिणाम दिसून आले. डॉ. शिवा शर्मा यांनी सांगितले की रुद्राक्ष केवळ धारण करण्यासाठीच नव्हे तर औषधाच्या रूपानेही लाभदायक आहे. 26 घटकांनी संपन्न असलेल्या रुद्राक्षाच्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक फिल्डचा मानवाच्या बायो इलेक्ट्रिसिटीशी संपर्क येताच ते हीलिंग थेरपीचे काम करू लागते. त्यामुळे रक्तदाब, तणाव यापासून आराम मिळतो. यामध्ये अनेक लाभदायक फायटो केमिकल्सही आहेत. अल्कलॉईड, फिनोलिक व फ्लेवेनाइडस् फायटो केमिकल्सचे अतुलनीय संतुलन यामध्ये आहे. ते कर्करोगाच्या रुग्णासाठी अतिशय लाभदायक ठरू शकते. रुद्राक्षातील फायटो केमिकल्सची क्षमता आणि प्रभाव केमोथेरपीसारखी आहे. केमोथेरपीमुळे केस गळणे, तहान-भूक न लागणे, बेचैनी, जीव घाबरा होणे असे अनेक साईड इफेक्टस् आहेत.

रुद्राक्षातील फायटो केमिकल्सचे असे कोणतेही साईड इफेक्ट नसतात. काही कर्करोगग्रस्त उंदरांवर रुद्राक्षामधील फायटो केमिकल्सच्या चाचण्या घेण्यात आल्या. या उंदरांना दिवसातून तीनवेळा फायटो केमिकल्सपासून बनवलेले औषध देण्यात आले. पंधरा-पंधरा दिवसांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. या काळात त्यांच्या तहान-भुकेवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांचे यकृत, किडनीचे कामही सुरळीत सुरू राहिले तसेच त्यांची पचनसंस्थाही चांगली होती. काही काळाने तपासणी केल्यावर थक्क करणारा परिणाम समोर आला. बहुतांश उंदीर कर्करोगातून मुक्त झाले होते. बंगळूरमध्ये झालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) च्या सेमिनारमध्ये रुद्राक्षापासून बनवलेल्या औषधाच्या शोधाची प्रशंसा करण्यात आली. सेमिनारमध्ये प्रशांत पांडे यांनी आपले प्रेझेंटेशन देत असताना सांगितले की रुद्राक्षापासून बनवलेल्या औषधाचा कर्करोगग्रस्त उंदरांवर अतिशय चांगला परिणाम दिसून आला. आता त्याची मानवावर चाचणी घेण्यात येणार आहे. बीएचयूच्या आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये येणार्‍या कर्करोगाच्या रुग्णांवर त्यांची चाचणी घेतली जाईल. त्यासाठी दोन्ही विद्यापीठांमध्ये करार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

Back to top button