विद्यार्थिसंख्या घटल्याने विद्यापीठे लागली कामाला | पुढारी

विद्यार्थिसंख्या घटल्याने विद्यापीठे लागली कामाला

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील महाविद्यालयांमध्ये यंदा क्षमतेपेक्षा खूप कमी प्रवेश झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थिसंख्या वाढविण्यासाठी विद्यापीठांकडून आता 12 वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल कनेक्ट हे संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.

महाविद्यालयांमधील स्थूल नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासोबतच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे होणार्‍या बदलांबाबत आणि त्याच्या सकारात्मक परिणामांबाबत माहिती देणे हा या अभियानाचा हेतू आहे. 15 जानेवारी ते 31 जानेवारी या काळात हे संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. अंमलबजावणीसाठी विद्यापीठ स्तरावर समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार आहे.

महाविद्यालयांमध्ये होणार कार्यशाळा

विद्यापीठातील परिक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांची यादी तयार करावी. संपर्क अभियानासाठी संलग्नित महाविद्यालयातील योग्य महाविद्यालयाची संयोजक महाविद्यालय म्हणून निवड करावी. या संयोजक महाविद्यालयांनी दोन सत्रांमध्ये कार्यशाळा घ्याव्यात. उपलब्ध सभागृहाच्या क्षमतेनुसार, कार्यशाळेसाठी आसपासच्या तीन-चार कनिष्ठ महाविद्यालयांतील 12 वीच्या विद्यार्थ्यांना पाचारण करावे. समन्वय समितीने संपर्क अभियान उपक्रमाचे काटेकोर नियोजन करावे, उपक्रमांचा संयुक्त आराखडा तयार करावा, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने म्हटले आहे.

Back to top button