सुषमा अंधारे यांच्यावर मालेगावी गुन्हा दाखल | पुढारी

सुषमा अंधारे यांच्यावर मालेगावी गुन्हा दाखल

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा; शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्मीयांच्या पवित्र देवता प्रभू श्रीराम व श्रीकृष्ण यांच्याबद्दल अक्षेपार्ह, बदनामीकारक व हिंदूच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अमन परदेशी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात अंधारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका खासगी वाहिनीच्या मुलाखतीत अंधारे यांनी प्रभू श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या संबंधी हिन दर्जाचे व बदनामीकारक वक्तव्य केले आहे. अंधारे यांच्या बदनामीकारक वक्तव्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप परदेशी यांनी केला आहे. भारतीय पुरावा कायदा कलम ६५ ब अन्वये यू ट्यूबवरील क्लिप पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आल्यानंतर परदेशी यांच्या फिर्यादीवरुन अंधारे यांच्या विरोधात मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी याप्रकरणी संबंधितांचे जबाब नोंदविले आहेत. त्याचप्रमाणे अंधारे यांना ही जबाबासाठी बोलावले जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापुर्वी उबाठा शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर जिल्हा बँकेचे कर्ज थकविल्या प्रकरणी रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ते गेल्या दीड महिन्यापासून तुरुंगात आहेत. त्यानंतर खासदार संजय राऊत यांच्यावर पालकमंत्री दादा भुसे यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. आता या दोघांपाठोपाठ अंधारे यांच्यावर देखील मालेगावात गुन्हा दाखल झाला असल्याने ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हेही वाचा :

Back to top button