जालना- मुंबई वंदे भारत आजपासून धावणार | पुढारी

जालना- मुंबई वंदे भारत आजपासून धावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि.३०) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. नवीन एक्स्प्रेसमुळे नाशिक-मुंबईचा प्रवास अधिक जलद होणार आहे.

अयोध्या येथून पंतप्रधान मोदी देशातील पाच वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रारंभ करणार आहेत. मुंबई-जालना एक्स्प्रेसचा यात समावेश आहे. नव्याने सुरू होणारी रेल्वे शुक्रवार वगळता आठवड्यातून सहाही दिवस धावणार आहे. ताशी १३० किलोमीटर वेगाने वंदे भारत धावणार असून, रेल्वेगाडीला १६ बोग्या आहेत. संपूर्णपणे वातानुकूलित असणाऱ्या एक्स्प्रेसला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिकरोड, ठाणे, दादर व सीएसएमटी (मुंबई) असे थांबे असतील. तर परतीच्या प्रवासात मुंबई येथून १ वाजून १० मिनिटांनी निघणार असून, नाशिकला ४ वाजून २८ मिनिटांनी पोहोचेल. या नव्या एक्स्प्रेसमुळे मराठवाडा ते मुंबईचा प्रवास अधिक जलद होणार आहे.

उद‌्घाटनाच्या दिवशी पंतप्रधान मोदी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी निमंत्रित मान्यवर एक्स्प्रेसमधून प्रवास करणार आहेत. दरम्यान, नाशिकराेडमार्गे मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस धावत असून, त्यानंतर मुंबई-जालना एक्स्प्रेस सुरू होत असल्याने नाशिकरांना अधिक जलद मुंबई गाठता येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button