पुरुषोत्तम करंडक स्पर्धा : आव्वाज.. एसपी कॉलेजचा..! | पुढारी

पुरुषोत्तम करंडक स्पर्धा : आव्वाज.. एसपी कॉलेजचा..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुणाला पहिला क्रमांक मिळणार याची हुरहूर विद्यार्थ्यांना लागली होती… ‘कृष्णपक्ष’ या एकांकिकेचे नाव
उच्चारताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या ‘कृष्णपक्ष’ या एकांकिकेने शुक्रवारी ‘पुरुषोत्तम करंडका’वर नाव कोरले आणि सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. सांघिक द्वितीय पारितोषिक देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (कोल्हापूर) ‘असणं नसणं’ आणि सांघिक तृतीय पारितोषिक महावीर कॉलेजच्या (कोल्हापूर) ‘निर्झर’ या एकांकिकांनी पटकावला.

तर सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिका शहाजी लॉ कॉलेजची (कोल्हापूर) ‘जंगल जंगल बटा चला है’ ही ठरली. यंदाच्या महाअंतिम फेरीतील बहुतांश पारितोषिके कोल्हापूरच्या महाविद्यालयीन संघांनी पटकावली असून, शुक्रवारी निकाल जाहीर होताच, ‘आव्वाज कुणाचा…, जगात भारी कोल्हापुरी…अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी नाट्यगृह दणाणून सोडले. महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिरात पार पडली.

स्पर्धेत सुमारे 19 संघांच्या एकांकिका सादर झाल्या. स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण फिरोदिया करंडक स्पर्धेचे प्रमुख सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष अनंत निघोजकर, चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र ठाकूरदेसाई, परीक्षक रवींद्र खरे, प्रदीप वैद्य, दिलीप जोगळेकर उपस्थित होते. कुलकर्णी यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत महाविद्यालयीन जीवन समरसून, समृद्धपणे जगा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच, रंगमंचावरील वावर भविष्यातील वाटचालीसाठी सुद्धा उपयुक्त ठरतो, मनातील न्यूनगंड दूर सारला जातो. कल्पनाशक्तीला वाव मिळतो, असेही त्यांनी सांगितले.

परीक्षक रवींद्र खरे म्हणाले, अट्टाहासाने नाटक जमत नाही, तर संहितेच्या गाभ्यात नाटक गवसते. हशा, टाळ्या मिळविण्यासाठी नाटक केल्यास त्याचे यश क्षणभंगूर ठरते. कलाकाराच्या अस्तित्वाची समिधा दिल्यानंतरच पात्राच्या भूमिकेत शिरता येते. नाटक ही कला भिन्न प्रकृतीच्या व्यक्तींचे एका वेळी, एकत्रितपणे समाधान करू शकते.

  • अभिनय नैपुण्य अभिनेता – गंधार जोग (जंगल जंगल बटा चला है, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर).
  • अभिनय नैपुण्य अभिनेत्री – शिरीन बर्वे (कृष्णपक्ष, स. प. महाविद्यालय, पुणे)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – गंधार जोग (जंगल जंगल बटा चला है, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर).
  • वाचिक अभिनय नैपुण्य – भारत प्रभुखोत (निर्झर, महावीर कॉलेज, कोल्हापूर)
  • वैयक्तिक अभिनय नैपुण्य – पीयुष जामदार (असणं नसणं, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)

हेही वाचा

Back to top button