‘आरक्षण मिळेपर्यंत आपल्या नेत्याला मोठे समजू नका’, जरांगे-पाटील यांचे कन्नड येथील सभेत आवाहन | पुढारी

'आरक्षण मिळेपर्यंत आपल्या नेत्याला मोठे समजू नका', जरांगे-पाटील यांचे कन्नड येथील सभेत आवाहन

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : सत्तर वर्षापासून मराठा समाजाच्या राज्यकर्त्यांनी वाटोळे केले आहे. प्रत्येक पक्षातील नेते मोठे केले, मात्र आज आपल्या हक्काचे आरक्षण मागतोय तर एकही नेता आपल्या बाजूने बोलायला तयार नाही. त्यांच्या सभेचे पोस्टर आपल्या लेकारांनी चिटकविले मात्र त्याच नेत्यांचा भैय्यासाहेब आज आपल्या सभेचे पोस्टर चिटकवतो का?.. आज आमची लेकरं आरक्षण मिळत नाही, म्हणून मरायला लागली आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाजाने जातीपेक्षा कोणत्याही पक्षाच्या नेत्याला मोठे समजू नये, असे आवाहन मनोज जरांगे- पाटील यांनी उपस्थितीत समाज बांधवांना केले.

कन्नड येथे शनिवारी (दि. २) गिरणी मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सभेचे आयोजन सकल मराठा समाजाकडून करण्यात आले होते. सायंकाळची सभा थेट रात्री पाऊणे बारा वाजता सुरू झाली, तरीही या सभेला महिलांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. या मैदानावरील ही सर्वात मोठी रेकॉर्डब्रेक सभा झाली.

यावेळी जरांगे म्हणाले, सध्या जगावे, की मरावे अशी परिस्थिती झाली असून माय – बापाने रात्रंदिवस कष्ट करुन स्वप्ने बघायची आणि आरक्षणा अभावी ती भंग व्हायची. आपल्या पाच पिढ्यांचे वाटोळे झालं आहे. आता आपला लढा हा आपल्यालाच लढावा लागेल, आपल्या मदतीला कोणीही येणार नाही. समाज भरकटत चालला असून आपण दूरदृष्टी व शांतता ठेवली पाहिजे. मुलांच्या होणाऱ्या जीवन संपवल्याच्या घटना रोखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. आता एकजूट झालीय एकमेकांना साथ द्या. आपण रक्ताचे भावबंध आहोत. षडयंत्र रचणारे सत्तर वर्ष यशस्वी झालेत. राज्यात ३२ लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या असून आपले आंदोलन ८०% यशस्वी झाले आहे. ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे, त्यात बाधा येता कामा नये. सरकारने आता मराठा समाजाचा अंत न बघता २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे, अन्यथा सरकारला पुढील आंदोलन झेपणार नाही, असे जरांगे- पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

गावा- गावात शांततेत साखळी उपोषणे सुरू करा. उद्रेक व जाळपोळ न करता शांततेत आंदोलने करा. ओबीसी बांधव हा आपलाच असून मराठा व ओबीसी असा वाद करू नका, आपआपसातील संबंध कायम ठेवा. काही राजकीय लोकांचा दिशाभूल करण्याचा डाव हाणून पाडा, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी यावेळी केले.

राजकीय फायद्यासाठी जातीयवादी भाषणे

मी कोणाचं नाव घेत नाही, मात्र काहींना राजकीय फायद्यासाठी जातीयवादी भाषणे करून समाजात जातीय तेढ निर्माण करायची आहे. जातीय तेढ निर्माण करून दंगली घडविण्याचे प्रयत्न ते करत असून हा डाव समाजाने ओळखावा, अशी टीका नाव न घेता जारंगे- पाटील यांनी भुजबळांवर केली. गर्दी जमविण्यासाठी धनगर समाजाचा वापर केला जात आहे. आज आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. त्यांनी आमच्या आरक्षणासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहावे, असेही जरांगे -पाटील यावेळी म्हणाले.

जरांगेंनी घोषणाबाजीवरून फटकारले

मनोज जरांगे यांचे भाषण सुरू असताना काही तरुणांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी जरांगे यांनी आपण मराठे आहोत, कुणाविषयी बोलण्याची आपली संस्कृती नाही. यामुळे अजिबात कुणाविषय़ी घोषणा द्यायच्या नाहीत, असे फटकारले. त्यामुळे पूर्ण सभा होईपर्यंत कोणीही कोणत्याही नेत्यांच्या विरुद्ध घोषणा दिल्या नाहीत.

हेही वाचा :

Back to top button