बुलढाणा : अग्नीवीर जवान अक्षय गवते यांचा सियाचीनमध्ये हृदयविकाराने मृत्यू | पुढारी

बुलढाणा : अग्नीवीर जवान अक्षय गवते यांचा सियाचीनमध्ये हृदयविकाराने मृत्यू

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या नऊ महिन्यांपासून सैन्यदलात सियाचीन क्षेत्रात अग्नीवीर म्हणून कर्तव्यावर असलेल्या जवानाचा आज (दि. २२) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक मृत्यू झाला आहे. अक्षय लक्ष्मण गवते (रा. २२ रा.पिंपळगाव सराई, ता.बुलढाणा) असे या जवानाचे नाव आहे.

ही दु:खद वार्ता समजल्यानंतर अग्नीवीर अक्षय गवते यांचे मूळगाव पिंपळगाव सराई व परिसरात शोककळा पसरली आहे. लेह-लदाखमधील सियाचीन ग्लेशियर या उंच बर्फाळ प्रदेशात टेलिफोन ऑपरेटर म्हणून सैन्यदलात ३० डिसेंबर २०२२ ला अक्षय गवते हे कर्तव्यावर रूजू झाले होते.अवघ्या नऊ महिन्यांची सेवा झालेल्या अक्षय यांना २०आक्टोबर रोजी रात्री ११.३५वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उपचारासाठी तात्काळ सैनिकी रूग्णालयात हलविण्यात आले परंतू तेथे त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.बावीस वर्षीय अक्षय गवते हे आईवडिलांचे एकूलते पुत्र होते.त्यांच्या पश्चात एक लहान बहिण आहे.अग्नीवीर अक्षय यांचे पार्थिव जम्मू-कश्मीर येथून विमानाने दिल्लीमार्गे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहचले असून सोमवार २३आक्टोबरला त्यांचे मूळगाव पिंपळगाव सराई येथे दाखल होईल व तेथे त्यांचेवर अंतिम संस्कार केले जातील.अक्षय यांचे शालेय शिक्षण गावातीलच जनता विद्यालयात झाले होते.

Back to top button