सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कायम; पूरसद़ृश स्थिती | पुढारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कायम; पूरसद़ृश स्थिती

सिंधुदुर्गनगरी ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्याला गेले चार दिवस पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 115.27 मिलीमीटर एवढा सरासरी पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाचा घाटमार्गांनीही फटका बसला असून करुळ घाट बंद झाला आहे. जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील काही रस्ते बंद झाले आहेत.

दहा ते बारा दिवस विश्रांती घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सतत पाऊस कोसळत असल्याने नदी-नाल्यांना पूर येऊन जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी रस्त्यांवर आल्याने काही रस्ते बंद झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यात 26 जुलैपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मालवण तालुक्यात सर्वाधिक 139 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 115.27 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक मालवण तालुक्यात 139 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 1586.48 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 81(1605), सावंतवाडी – 113(1756.1), वेंगुर्ला – 133.20(1285.8), कुडाळ – 98(1422), मालवण – 139(1763), कणकवली – 111(1713), देवगड – 118(1478), वैभववाडी – 129(1661), असा पाऊस झाला आहे.

Back to top button