Luna 25 Mission : रशियाचे ‘लुना 25’ लाँच; ‘चांद्रयान 3’ पूर्वी चंद्रावर उतरणार? भारताची दक्षिण ध्रुवावर सर्वात पहिले यान उतरवण्याची संधी हुकेल? | पुढारी

Luna 25 Mission : रशियाचे 'लुना 25' लाँच; 'चांद्रयान 3' पूर्वी चंद्रावर उतरणार? भारताची दक्षिण ध्रुवावर सर्वात पहिले यान उतरवण्याची संधी हुकेल?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Luna 25 Mission : रशिया 47 वर्षानंतर पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी तयार आहे. भारतानंतर रशियाने लूनर मिशन लूना 25 लाँच केले आहे. मॉस्कोपासून ५५०० किमी पूर्वेस असलेल्या अमूर ओब्लास्टच्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम येथून लुना 25 आज शुक्रवारी (दि. 11) पहाटे 4.40 वाजता येथून लाँच करण्यात आले. हे यान लाँच करण्यासाठी रशियाने संपूर्ण गाव रिकामे करण्यात आले होते. भारताच्या चांद्रयान-3 च्या आधी रशियाचे लुना-25 चंद्रावर पाऊल ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.

Luna 25 Mission : रशियाचे लुना ग्लोब मिशन

रशियन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने 47 वर्षानंतर चंद्रावर मोहीम आखली आहे. याला त्यांनी लुना-ग्लोब मिशन असे नाव दिले आहे. रॉकेटची लांबी सुमारे 46.3 मीटर आहे, तर त्याचा व्यास 10.3 मीटर आहे. रशियाची अंतराळ संस्था रोसकोसमॉसने म्हटले आहे की, लुना-25 चंद्रावर रवाना झाले आहे. पाच दिवस ते चंद्राकडे सरकणार आहे. यानंतर 313 टन वजनाचे रॉकेट 7-10 दिवस चंद्राभोवती फिरणार आहे. 21 किंवा 22 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

Luna 25 Mission : भारताच्या चांद्रयान प्रमाणेच ‘लुना 25’ सुद्धा दक्षिण ध्रुवावर उतरणार

रशियन माध्यमांच्या माहितीनुसार, रशियाचे हे लुना मिशन भारताप्रमाणेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा वेध घेण्यासाठी आखण्यात आले आहे. लूना 25 हे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. इस्रोने तसेच नासाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी आढळल्याचे म्हटले होते. Luna-25 मध्ये रोव्हर आणि लँडर आहे. त्याचे लँडर सुमारे 800 किलो आहे. Luna-25 सॉफ्ट लँडिंगचा सराव करेल. लँडरमध्ये एक विशेष उपकरण आहे, जे पृष्ठभागाच्या सहा इंच खोदकाम करेल. लुना 25 खडक आणि मातीचे नमुने गोळा करेल. त्यामुळे गोठलेल्या पाण्याचा शोध लागू शकतो. भविष्यात जेव्हाही मानव चंद्रावर तळ तयार करेल तेव्हा त्यांना पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, हा रशियाचा उद्देश आहे.

Luna 25 Mission : ‘लुना 25’ पहिले पोहोचल्यास भारत या संधीस मुकेल

आतापर्यंत जितक्या चांद्रमोहिमा झाल्या आहेत. त्या सर्व मोहिमा चंद्राच्या विषुववृत्तावर झालेल्या आहेत. भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 उतरवण्याची मोहीम आखली आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव अत्यंत कठीण आहे. त्यामुळे इथे आतापर्यंत कोणीही यान उतरवू शकलेले नाही. चांद्रयान 2 ही भारताची मोहीम अपयशी ठरल्यानंतर भारताने पुन्हा एकदा दक्षिण ध्रुवावर स्वारीची तयारी केली आहे.
मात्र, रशियाचे लुना 25 हे यान देखील चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असल्याची माहिती रशियन माध्यमांनी दिली आहे. तसेच लुना 25 21 किंवा 22 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

त्याच वेळी, चांद्रयान-3 भारताने 14 जुलै रोजी प्रक्षेपित केले, जे 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. लुना-25 आणि चांद्रयान-3 ची लँडिंगची वेळ जवळपास सारखीच असेल. काही तास आधी लूना चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. रशियाने याआधी 1976 मध्ये लुना-24 चंद्रावर उतरवले होते. जर Luna-25 यशस्वी ठरले, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एखादा देशाने यान उतरण्याची ही पहिलीच वेळ असेल तो विक्रम रशियाच्या नावावर नोंदवला जाईल आणि भारताची संधी हुकेल. Luna 25 Mission

हे ही वाचा :

Back to top button