ब्रेकिंग : पालघरजवळ मुंबई-जयपूर रेल्वेमध्ये गोळीबार; चार प्रवाशांचा मृत्यू | पुढारी

ब्रेकिंग : पालघरजवळ मुंबई-जयपूर रेल्वेमध्ये गोळीबार; चार प्रवाशांचा मृत्यू

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जयपूर ते मुंबई रेल्वेमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दहिसर ते मीरारोडदरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये एका आरपीएफ जवनाचा देखील समावेश आहे. सोमवारी पहाटे साडे पाच वाजता ही घटना घडली आहे. आरपीएफ जवानांमधे झालेल्या वादातून गोळीबार झाल्याचे समजते.

दरम्यान, या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबारानंतर जयपूर- एक्स्प्रेस रेल्वेमधील चार जणांचा मृत्यू झाला. कोच B5 मध्ये ट्रेन क्रमांक १२९५६ मध्ये ही घटना घडली. (Jaipur-Mumbai Train Firing)

वृत्तानुसार, एस्कॉर्ट ड्युटीवर असलेल्या चेतनने एस्कॉर्ट इनचार्ज एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केला. पालघर येथून रेल्वे निघाल्यानंतर गोळीबाराची घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर आरपीएफ कॉन्स्टेबलने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या रेल्वेत गोळीबार केला. त्याने एक आरपीएफ एएसआय आणि इतर तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर दहिसर स्टेशनजवळ त्याने रेल्वेतून उडी मारली. आरोपी कॉन्स्टेबलला त्याच्याकडील शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

“रेल्वेतील गोळीबाराच्या घटनेची सकाळी ६ वाजता आम्हाला माहिती मिळाली. एस्कॉर्टिंग ड्युटीवर असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केला. यात चार जणांचा मृत्यू झाला. रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. त्यांना मदत दिली जाईल.” अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार यांनी दिली.

Back to top button