इटलीमध्ये ग्लेशियर झाकले जात आहे सफेद कापडाने ! | पुढारी

इटलीमध्ये ग्लेशियर झाकले जात आहे सफेद कापडाने !

रोम : इटली मध्ये सफेद कापडाने ग्लेशियर झाकले जात असल्याचे अनोखे वृत्त आले आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे जगभरातील ग्लेशियर वितळत आहेत. मोठ्या प्रमाणात बर्फ वितळत असल्याने समुद्राचा जलस्तरही वाढत आहे. जगातील सर्वात थंड ठिकाणेही सध्या उच्चांकी तापमानाचा सामना करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर इटलीतून एक अनोखे वृत्त आले आहे. तिथे तापमानवाढीमुळे आकुंचित होत चाललेल्या ग्लेशियरच्या संरक्षणासाठी त्यावर सफेद कापड झाकण्यात आले आहे!

तापमानवाढीमुळे इटलीतील ग्लेशियर्सही वितळून आकसत चालली आहेत. त्यांच्या रक्षणासाठी अनेक उपाय केले जात आहेत. उत्तर इटलीतील प्रेसेना ग्लेशियरचा त्यामध्ये समावेश आहे.

हे ग्लेशियर तुटले तर मोठीच आपत्ती येऊ शकते. त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी त्याच्या संरक्षणासाठी अनोखा उपाय केला आहे. हे ग्लेशियर सफेद कापडाच्या पट्ट्यांनी आच्छादित केले जात आहे. या सफेद कापडामुळे सूर्यप्रकाश परावर्तित होऊन त्याच्या उष्णतेची झळ ग्लेशियरना लागणार नाही, असे अनुमान आहे.

हे सुरक्षात्मक आवरण 70 टक्के बर्फ वितळण्यापासून रोखू शकते. कारच्या विंडोवर जसे तापमान नियंत्रणासाठी सिल्व्हर रिफ्लेक्टिव्ह गार्ड लावले जातात, तशाच पद्धतीने हे आवरण काम करील. ग्लेशियर झाकण्याचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी एक महिना लागेल.

अर्थातच हे काम केवळ याच वर्षी होत नाही. 2008 पासून अशा पद्धतीने ग्लेशियर झाकले जात आहे. 1.2 लाख चौरस मीटर आकाराचे हे ग्लेशियर पाच मीटर रुंद आणि 70 मीटर लांबीच्या कापडी पट्टीने झाकले जात आहे.

Back to top button