Campus Drive : चारशे कोटींच्या घरपट्टीसाठी नाशिक मनपाचा ‘ॲक्शन प्लॅन’ | पुढारी

Campus Drive : चारशे कोटींच्या घरपट्टीसाठी नाशिक मनपाचा 'ॲक्शन प्लॅन'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घरपट्टी वसुलीसाठी थकबाकीदारांसाठी महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या सवलत योजनेला नागरिकांच्या प्रतिसादानंतरही कागदोपत्री तब्बल चारशे कोटींची थकबाकी दिसून येत असल्याने, महापालिकेच्या कर विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. हा थकबाकीचा आकडा कमी करण्यासाठी आता महापालिकेच्या कर विभागाकडून ‘ॲक्शन प्लॅन’ आखण्यात आला असून, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच त्यासाठी शहराच्या सर्व विभागांत कॅम्पस ड्राइव्ह घेण्यात येणार आहे.

गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करवसुलीचे ध्येय पूर्ण करणाऱ्या महापालिकेच्या कर विभागासमोर चालू आर्थिक वर्षात २१० कोटींचे ध्येय आहे. त्यासाठी अत्यंत प्रभावीपणे सवलत योजना राबविली जात असून, १ एप्रिल ते २० जूनपर्यंत तब्बल ८० कोटी ६९ लाख रुपयांची वसुली झाली आहे. मात्र, अशातही चारशे कोटींची थकबाकी दिसून येत आहे. दरम्यान, यातील बहुतांश वसुली एकाच मालमत्तेवर म्हणजेच भूखंड आणि इमारतीशी संबंधित आहे. असे जवळपास ३१ हजार १६३ थकबाकीदार आहेत. याशिवाय वडिलांनी मुलांच्या नावे मालमत्ता केल्यास येथेही दोघांच्या नावाने एकाच मालमत्तेवर थकबाकी दाखविली जात आहे. तसेच इतरही कारणांनी मालमत्तांवर कागदोपत्री कर आकारला जात असल्याने थकबाकीचा फुगवटा झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करून पुढील महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात महापालिकेच्या कर विभागाकडून शहरातील सहाही विभागांत विशेष मोहीम राबविली जाणार असून, त्यात ही सर्व प्रकरणे निकाली काढणार आहेत. ज्या भूखंड आणि इमारतींवर दुहेरी कर आकारणी केली जात आहे, त्या सर्व मालमत्तांची यादीच कर विभागाने तयार केली असून, विभागवार कॅम्पस ड्राइव्हमध्ये ही सर्व प्रकरणे जागेवर निकाली काढणार आहेत.

असा असेल ड्राइव्ह

३ व ४ जुलै रोजी नाशिक पश्चिम आणि सातपूर विभागात, त्यानंतर ६ जुलै रोजी नाशिकरोड, ७ जुलै रोजी पूर्व, १० जुलै नवीन नाशिक, तर ११ जुलै रोजी पंचवटी भागात कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करणार आहे.

२० दिवसांत १५ कोटी वसूल

महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या सवलत योजनेला नाशिककरांचा चांगला लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत जून महिना अखेरचा असून, या महिन्यात कर भरणा करणाऱ्यांना रकमेवर तीन टक्के सवलत दिली जाणार आहे. दरम्यान, चालू जून महिन्यात २० दिवसांत तब्बल १५ कोटी ७८ लाख रुपयांचा कर झाला असून, ग्राहकांनी ३२ लाख रुपयांची सवलत पदरात पाडून घेतली आहे. विशेषत: शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भरणा केला जात आहे.

दुहेरी घरपट्टी असलेल्या मालमत्तांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढील महिन्यात विभागवार कॅम्पस ड्राइव्ह राबविणार आहे. या ड्राइव्हच्या माध्यमातून रेकॉर्डवर दिसत असलेला थकबाकीचा आकडा कमी होईल. तसेच सवलत योजनेचा अखेरचा महिना असल्याने, अधिकाधिक ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा. – श्रीकांत पवार, उपआयुक्त कर विभाग.

हेही वाचा:

Back to top button