नाशिक : विद्यार्थ्यांच्या “आधार’ अपडेटसाठी शाळांना दोन दिवसांचा अल्टिमेटम | पुढारी

नाशिक : विद्यार्थ्यांच्या "आधार' अपडेटसाठी शाळांना दोन दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शासनाने राज्यातील शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करून ते सरल प्रणालीवर वैध करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट न झाल्याने शिक्षण विभागानेच आता कंबर कसली आहे. शाळांना भेट देत शिक्षण विभागातील यंत्रणाच आधार वैध करण्याची मोहीम राबविणार आहे. त्यासाठी विशेष पथकांची निर्मिती केली जाणार असून, येत्या दोन दिवसांत आधार अपडेट करण्याचा अल्टिमेटम जिल्‍हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भगवान फुलारी यांनी दिला.

शिक्षण विभागाच्‍या विद्यार्थी आधार वैध करण्याच्या सूचनेकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने मंगळवारी (दि. ३०) रावसाहेब थोरात सभागृहात बैठक घेत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी महापालिका शिक्षण विभागाच्‍या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर, शिक्षक संघटनेचे नंदलाल धांडे, शिक्षण विभागाच्‍या पिंगळकर आदी उपस्‍थित होते. आढावा बैठक घेऊनही शहरातील शाळांमधील सुमारे १५ टक्‍के विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्याचे काम राहिल्याने तसेच इंग्रजी शाळांच्‍या असहकार्याबद्दल फुलारी यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या बैठकीत विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड अपडेट प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी मुख्याध्यापक, शाळांच्या प्रतिनिधींनी मांडल्‍या. परप्रांतीय विद्यार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण करताना दमछाक होत असून, काही विद्यार्थी थेट नेपाळचे असून, त्‍यांच्‍याकडे आधारकार्डच नाही. अशा विद्यार्थ्यांना वंचित ठेवायचे का? असा प्रश्‍न उपस्‍थित संबंधितांनी उपस्थित केला.

मान्यता रद्द करण्याचा इशारा

आधार वैधता न झालेली विद्यार्थी संख्या मोठी असलेल्‍या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. आधार अपडेटकडे दुर्लक्ष करणाऱ्या अनुदानित शाळांचे अनुदान रोखले जाईल, तर विनाअनुदानित व स्‍वयंअर्थसाहाय्य शाळांची मान्‍यता रद्द करण्याचा प्रस्‍ताव पाठविण्याचा इशारा मनपा प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिला आहे.

हेही वाचा:

Back to top button