चीनने अंतराळ स्थानकावर पाठवले तीन अंतराळवीर

बीजिंग : चीनने मंगळवारी आपल्या तीन अंतराळवीरांना अंतराळात रवाना केले. हे अंतराळवीर चीनच्या स्पेस स्टेशनमध्ये क्रू रोटेशननुसार पाठवले जात आहेत. चीनने 2021 मध्ये स्वतःच्या अंतराळ स्थानकाचे संचालन सुरू केले होते. त्यावेळेपासूनची ही पाचवी मानव मोहीम आहे.
अंतराळयान ‘शेनझोउ-16’ किंवा ‘डिव्हाईन व्हेसल’ च्या मदतीने चीनने तीन अंतराळवीरांना सकाळी साडे नऊ वाजता वायव्य चीनच्या जिउक्वान सॅटेलाईट लाँच सेंटरमधून रवाना केले. हे सेंटर गोबी वाळवंटात आहे. या तीन अंतराळवीरांची नावे जिंग हॅपेंग, झू यांग्झू आणि गुई हाइचाओ अशी आहेत.
‘शेनझोउ-16’ मध्ये जाणारे हे तीन अंतराळवीर सध्या अंतराळ स्थानकात असलेल्या तीन अंतराळवीरांची जागा घेतील. सध्या तिथे राहत असलेले अंतराळवीर गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ‘शेनझोउ-15’ अंतराळयानातून तिथे गेले होते. गेल्यावर्षीच्या अखेरपर्यंत चीनचे हे अंतराळस्थानक पूर्णपणे कार्यान्वित झाले होते. चीनने 2030 पर्यंत चंद्रावरही आपले अंतराळवीर पाठवण्याची योजना आखली आहे.