सोशल मीडियामुळे कुत्रा बनला कोट्यधीश!

वॉशिंग्टन : सोशल मीडिया हे आता अनेकांसाठी आपले टॅलेंट लोकांसमोर प्रदर्शित करण्याचे आणि त्याच माध्यमातून कमाई करण्याचा स्रोत बनले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, यू-ट्यूब यासारख्या असंख्य व्हिडीओ प्लॅटफॉर्मचा लाभ करून घेऊन अनेक जण लाखो आणि कोट्यवधी रुपये कमवत आहेत. सोशल मीडियामुळे सोशल मीडिया एन्फ्लुएर्सदेखील मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. अशा अनेकांना तुम्हीही ओळखत असाल, फॉलो करत असाल; पण यामध्ये प्राणीही मागे राहिले नाहीत. असाच एक पाळीव कुत्रा आहे, जो सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवत आहे. ‘टर टकर’ नावाचा एक गोल्डन रिट्रायव्हर जातीचा पाळीव कुत्रा आहे. त्याची वार्षिक कमाई तब्बल 8 कोटी 28 लाख रुपये आहे.
‘प्रीटेंड पेट मेमरीज’ नावाची एक संस्था पाळीव प्राण्यांच्या डिजिटल इन्फ्लुएन्सचा शोध घेते. त्यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे, की टकर जगभरातल्या आघाडीच्या एन्फ्लुएन्सर्सपैकी एक आहे. टकरच्या डिजिटल स्टारडमच्या मागे कोर्टनी बडगिनचे कष्ट आहेत. ती टकरची मालकीण असून, त्याचे सर्व सोशल मीडिया अकाऊंटस् सांभाळते. तिने दिलेल्या माहितीनुसार, यू-ट्यूबवर टकरचा 30 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केल्यास 30 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कमाई होते. शिवाय, फक्त 3 ते 8 इन्स्टाग्राम स्टोरीज तयार केल्याने टकरला 16 लाख रुपये मिळतात. इतकंच नाही तर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचे उत्पन्न गृहीत धरून टकरच्या वार्षिक कमाईने तब्बल आठ कोटींचा टप्पा गाठला आहे.
सुरुवातीला टकरची मालकीण कोर्टनी घराच्या साफसफाईशी संबंधित कामे करायची. तिचा पती सिव्हिल इंजिनिअर. टकरच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे त्यांनी आपली कामे सोडली आणि टकरच्या सोशल मीडिया अकाऊंटस्वर लक्ष केंद्रीत केली. दिवसेंदिवस टकरच्या प्रसिद्धीत मोठी वाढ होऊ लागली आणि आता त्याच्या माध्यमातून हे दाम्पत्य वर्षाकाठी आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करत आहे. टकरच्या स्टारडमची सुरुवात जून 2018 मध्ये झाली. तेव्हा तो फक्त आठ आठवड्यांचा होता. त्याचा मोठा होत असतानाचा प्रवास कुठेतरी जपून ठेवला जावा, या उद्देशाने कोर्टनीने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केले होते.