दोन महिने झोपून राहिल्यावर मिळणार सोळा लाख! | पुढारी

दोन महिने झोपून राहिल्यावर मिळणार सोळा लाख!

लंडन : युरोपमध्ये सध्या एक अनोखे संशोधन सुरू आहे. युरोपियन स्पेस एजन्सीकडून केल्या जात असलेल्या या संशोधनात अंतराळवीरांवरील न्यून गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कमी करण्यासाठीच्या शक्यता आजमावून पाहिल्या जात आहेत. या संशोधनासाठी बारा स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. त्यांना बाकी काही करावे लागणार नाही, केवळ बिछान्यावर दोन महिने पडून राहावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना दोन महिन्यांचे संशोधन पूर्ण झाल्यावर सोळा लाख रुपये मिळतील!

या अनोख्या संशोधनाची सध्या जगभर चर्चा आहे. या स्वयंसेवकांना दोन महिने बिछान्यावर पडल्या पडल्याच जेवावे लागेल. आंघोळ करीत असतानाही किमान एक खांदा बिछान्यावरच ठेवावा लागेल. त्यांना मल-मूत्र विसर्जनासाठीही बिछाना सोडण्याची परवानगी नाही. स्वयंसेवकांना ज्या बिछान्यावर दोन महिने झोपावे लागणार आहे तोही खास आरामदायक नाही.

या बिछान्यावर उशी घेण्याचीही परवानगी नाही. उलटपक्षी हा पलंग डोक्याच्या बाजूला सहा अंशाने झुकलेलाच असेल. त्यामुळे त्यांचे पाय काही अंशात वर आणि डोके खाली असेल. या दोन महिन्यांच्या काळात ते व्यायामही करू शकतील, मात्र तेही झोपूनच! त्यासाठी खास सायकल डिझाईन केली आहे. पडल्या पडल्याच या सायकलीचे पॅडल चालवता येऊ शकतील.

Back to top button