अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांनी आणला पाऊस | पुढारी

अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांनी आणला पाऊस

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यातील बहुतांश भागांत सोमवारी वळवाचा पाऊस बरसला. हा पाऊस कोकणात २ जून, तर उर्वरित राज्यात ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान मान्सून १० दिवस झाले तरी अंदमानातच मुक्काम ठोकून आहे. आगामी २४ तासांत त्याचा वेग वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मान्सूनचा मुक्काम दहा दिवसांपासून अंदमानातच असल्याने दक्षिण भारतात उष्मा वाढला आहे. तेथे ‘वेदर डिसकम्फर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. त्या उलट वातावरण उत्तर भारतात आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तानात तयार झालेल्या पश्चिमी चक्रवातामुळे हिमालयापासून जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशचा काही भाग या ठिकाणी पाऊस पडत आहे. त्या भागातून बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रात आल्याने महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडत आहे. सोमवारी राज्यातील बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली.

पुणे जिल्ह्यात गारपीट…

सोमवारी पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागांत वादळी वारे, पाऊस अन् गारपीट झाली. सर्वाधिक पाऊस डुडुळगाव येथे २० मिलिमीटर झाला. त्यापाठोपाठ भोर १३.५, पुणे शहरातील पाषाण ७.५, शिवाजीनगर ४.५ मिमी पाऊस झाला. शहरातील सांगवी, मोशी, औंध या भागांत जोरदार गारपीट झाली.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा…

अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे वाहत असून, त्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी आहे. त्यामुळे कोकणात २ जून तर मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात दिवसभर उन्हाची तीव्रता कायम असून, विदर्भाचा पारा अजूनही ४२ अंशांवर आहे, तर उर्वरित राज्यात तो ३८ ते ४० अंशांवर आहे.

Back to top button