यवतमाळ : सातपैकी चार बाजार समितीवर मविआची सत्ता | पुढारी

यवतमाळ : सातपैकी चार बाजार समितीवर मविआची सत्ता

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ जिल्ह्यातील सात बाजार समितींसाठी शुक्रवारी (दि.२८) मतदान शांततेत पार पडले. या निवडणुकीत सरासरी ९५ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदान संपताच संबंधित तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत विविध ठिकाणी मतमोजणी सुरू होती. जिल्ह्यातील सातपैकी चार बाजार समितीवर महाविकास आघाडीने विजय प्राप्त केला असून उर्वरित तीन बाजार समितीवर भाजप-शिंदे गटाने  बाजी मारली आहे.
यवतमाळमध्ये काँग्रेस-उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने १८ पैकी ११ जागा जिंकत समितीत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. येथे भाजपला चार जागांवर समाधान मानावे लागले, तर अपक्ष तीन जागांवर विजयी झाले.  दिग्रसमध्ये माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकत विजयी झेंडा फडकविला. येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट भाजपला अवघ्या चार जागा मिळाल्या. बाभूळगावमध्ये १८ पैकी १४ जागा जिंकत महाविकास आघाडीने सत्ता मिळविली आहे.

भाजपचे चार जागांवर समाधान

येथेही भाजपला चार जागांवर समाधान मानावे लागले. पुसद बाजार समितीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.  १८ पैकी सर्व १८ जागा जिंकत मनोहरराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनलची सत्ता पक्की झाली आहे. तर महागावमध्ये १८ पैकी १२ जागा भाजप- शिंदे व सर्वपक्षीयांनी पटकाविल्या आहेत. येथे राष्ट्रवादी- काँग्रेसला सहा जागांवर समाधान मानावे लागले. नेरमध्ये निकाल जाहीर झालेल्या १८ पैकी दहा जागा शिंदे गट व राष्ट्रवादी आघाडीने जिंकल्या आहेत, तर काँग्रेस- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आठ जागा मिळाल्या आहेत. वणीमध्ये १८ पैकी १४ जागेवर भाजप- शिंदे गटाने विजय प्राप्त केला असून काँग्रेस- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.
हेही वाचा 

Back to top button