नाशिक : वणी येथील मुरमुरा कारखाना बंद करावा; प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त | पुढारी

नाशिक : वणी येथील मुरमुरा कारखाना बंद करावा; प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

वणी येथील मुरमुरा कारखान्याच्या प्रदूषणासह दुषित पाण्यामुळे रहिवाशी परिसरातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील मुरमुरा कारखान्यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वणी : कारखान्यातील दुषित पाणी लगतच्या विहीरीत व बोअरवेलमध्ये झिरपत आहे. (सर्व छायाचित्रे : अनिल गांगुर्डे)
वणी सापुतारा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारालगत असलेला मुरमुरा तयार करणारा कारखाना कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडे रहिवाशी शेतकऱ्यांनी केली आहे. वणी सापुतारा रस्त्यावरील गट नं. ५१० येथे मुरमुरा तयार करण्याचा कारखाना आहे. मुरमुरा तयार करण्याच्या प्रक्रीयेतील दुषित पाण्यावर प्रक्रिया करून त्यानंतरच ते बाहेर सोडणे आवश्यकअसते. मात्र हे दुषित पाणी सर्रासपणे बाहेर सोडले जात आहे. त्यामुळे आजुबाजुच्या रहिवाशी शेतक-यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कारखान्यातील दुषित पाणी लगतच्या विहीरीत व बोअरवेलमध्ये देखील झिरपले जात आहे. परिणामी  द्राक्ष ,टोमॕटो व कांदा या पिकांवर त्याचा विपरित परीणाम होतो आहे. या संदर्भात येथील शेतक-यांनी निवेदन देऊन समस्या मांडल्या. दुषित पाण्याचा उग्र वास तसेच कारखान्याच्या चिमणीतून निघणारा धोकादायक धूर याचा परिणाम शेती पिकावर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दुषित पाण्यामुळे जनावर देखील पाणी पीत नसल्याने ऐन उन्हाळ्यात पशुधनाची समस्या भेडसावू लागली आहे. मुरमुरा कारखान्यातील धुरामुळे द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. एकीकडे असमानी संकट सतावत असून दुसरीकडे अशाप्रकारे कारखान्यामुळे द्राक्ष पिकांना मोठा फटका बसत आहे. निर्यातक्षम द्राक्ष चालू बाजारात विकण्याची वेळ शेतक-यावर आली आहे. या विरोधात आजुबाजुचे शेतकरी एकवटले असून या कारखान्याबाबत संबधीत विभागाने दखल घेणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे कारखान्याच्या  विरोधात जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ, वणी ग्रामपालिका, पंचायत समीती दिंडोरी, तहसीलदार दिंडोरी, प्रांतअधिकारी दिंडोरी, पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्र यांचेकडे लेखी स्वरुपात शेतकरी व व्यापारी यांनी तक्रारी केल्या आहेत. कारखान्यामुळे आरोग्य, पर्यावरण, पाणी, शेती यास धोका उत्पन्न झाल्याने मुरमुरा कारखाना कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी होत आहे. दरम्यान पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्र व वणी ग्रामपंचायत यांच्या भुमिकेमुळे  कारवाईचे घोंगडे भिजत पडले आहे. वणी ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र पांडाणे यांनी देखील दखल घेणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
प्रशासकीय पातळीवरील तपासणी आवश्यक
वणी येथील मुरमुरा कारखान्याला परवानगी देतांना पर्यावरण विभाग, ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने आवश्यक बाबी तपासण्या गरजेच्या होत्या. येथील दुषित पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजचे आहे. कारखान्यातून येणाऱ्या धूराचा परिसरातील पिकांवर परिणाम झाल्याने ते तपासून परवानग्या देणे आवश्यक होते. परंतु प्रशासकीय कामानुसार नोंदी आवश्यक असताना या सर्व बाबी प्रशासकीय पातळीवर तपासले असते तर हे प्रश्न उद्भवले नसते त्यास पूर्णपणे कारखाना यंत्रणाच जबाबदार असल्याचे मत निवेदनाव्दारे नोंदविण्यात आले आहे.
शेतजमीनीत टोमॅटो व कांदा उत्पादीत होतो आहे. मात्र मुरमुरा कारखान्याच्या दुषित पाणी व कारखान्यातून निघणाऱ्या रेतीयुक्त धुरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने मुरमुरा कारखानदाराला पाठीशी न घालता त्वरीत कारवाई करावी. – हर्षल जाधव, शेतकरी, वणी.

मुरमुरा कारखान्याच्या धुरामुळे द्राक्ष पिकावर विपरित परिणाम झाला होता. कमी दरात द्राक्ष विक्री करावी लागल्याने बँकेचे कर्ज कोठून भरायचे ? नाईलाजाने चार एकर द्राक्ष बाग तोडून टाकली आहे. मुरमुरा कारखान्यावर कारवाई करावी व तो कायमस्वरुपी बंद करण्यात यावा. नाहीतर शेतकऱ्यांच्या जमिनी मुरमुरा कारखानदाराने विकत घ्यावात. बाजारमुल्यानुसार आम्ही विक्री करण्यास तयार आहोत. -सचिन पवार, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक, वणी.
वणी गट ५१० मध्ये असलेल्या मुरमुरा कारखान्यातून दुषित पाणी काजळीयुक्त धुरामुळे आजुबाजुस असलेल्या शेतक-यांना नाहक त्रास होत असल्याचा अर्ज मिळाला आहे. संबंधित कारखान्याची दुषित पाणी, धुराची चौकशी करून नोटीस बजावण्यात येईल. तसेच प्रदुषण नियंत्रण विभागाच्या निकषा नुसार अटी शर्ती नुसार करण्याच्या सुचना देण्यात येतील. – जी आर आढाव, ग्रामविकास अधिकारी, वणी.

हेही वाचा:

Back to top button