कोल्हापूर : ‘राजाराम’च्या अध्यक्षपदाची निवड पुढील आठवड्यात | पुढारी

कोल्हापूर : ‘राजाराम’च्या अध्यक्षपदाची निवड पुढील आठवड्यात

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपद निवडीसाठी पुढील आठवड्यात नूतन संचालकांची पहिली बैठक होणार आहे. अध्यक्षपदासाठी अमल महाडिक यांचे नाव निश्चित असल्याचे समजते.
दरम्यान, कसबा बावड्यात अपेक्षित मते मिळाल्याने पहिल्या टप्प्यात उपाध्यक्षपदाची संधी दिलीप उलपे किंवा नारायण चव्हाण यांना मिळू शकते.

राजाराम साखर कारखान्याची निवडणूक माजी आमदार महादेवराव महाडिक व अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली. या निवडणुकीत आ. सतेज पाटील गटाचा धुव्वा उडवत सर्व उमेदवार त्यांनी निवडून आणले. प्रचारामध्ये अमल महाडिक यांनी पायाला भिंगरी बांधून रान उठवले होते. अतिशय संयमी पणाने त्यांनी ही निवडणूक हाताळली. त्यामुळे अध्यक्षपदासाठी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन दिवसांत साखर सहसंचालक कार्यालयाच्या वतीने अधिसूचना काढण्यात येईल. त्यानंतर चार दिवसांत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीची तारीख निश्चित करण्यात येईल.

Back to top button