नाशिक : इगतपुरी तंबाखूमुक्त शाळांचा तालुका घोषित | पुढारी

नाशिक : इगतपुरी तंबाखूमुक्त शाळांचा तालुका घोषित

नाशिक (तळेगाव) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी येथील पंचायत समिती सभागृह येथे सलाम मुंबई फाउंडेशन व एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्यामार्फत गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ‘तंबाखूमुक्त शाळांचा इगतपुरी तालुका’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गटविकास अधिकारी लता गायकवाड यांनी तंबाखूमुक्त शाळांचा इगतपुरी तालुका घोषित घोषित केला. त्यांनी शिक्षण विभागाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण अधिकारी नीलेश पाटील, तंबाखू नियंत्रण कक्षाच्या डॉ. शिल्पा बांगर, सलाम मुंबई फाउंडेशनचे दीपक पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी आर. पी. अहिरे, एस. आर. नेरे उपस्थित होते. इगतपुरी तालुका तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी गटशिक्षण अधिकारी पाटील, शिक्षणविस्तार अधिकारी राजेश तायडे, एस. आर. नेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक अजय चव्हाण, तज्ज्ञ मार्गदर्शक संजय येशी यांनी तालुकास्तरावर सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण दिले. तालुक्यातील सर्वच 318 शाळा या नऊ निकष पूर्ण करून तंबाखूमुक्त शाळा झाल्या. सर्व शाळांना सलाम मुंबई फाउंडेशन, एव्हरेस्ट फाउंडेशन आणि तंबाखू नियंत्रण कक्ष, आरोग्य विभाग नाशिक यांच्यातर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संजय येशी यांनी प्रास्ताविक केले. अजय चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी तालुक्याचे 108 मुख्याध्यापक, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख उपस्थित होते.

‘भावी पिढी व्यसनमुक्त ठेवण्यास कटीबध्द’
यश गाठणे जसे अवघड असते तसेच यश टिकवून ठेवणे त्याहीपेक्षा अवघड असते. परंतु इगतपुरी शिक्षण विभाग हे यश टिकवून ठेवले आणि सर्व निकष शाळास्तरावर पूर्ण ठेवून भावी पिढी ही तंबाखूमुक्त व व्यसनमुक्त ठेवण्यास इगतपुरी तालुक्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षण विभाग कटिबध्द असेल, असे मत तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांनी मांडले.

हेही वाचा:

Back to top button