सिंधुदुर्ग : ‘हापूस’ महागला! कोकणी मेवा उत्पादनही घटले | पुढारी

सिंधुदुर्ग : ‘हापूस’ महागला! कोकणी मेवा उत्पादनही घटले

कणकवली; अजित सावंत : कोकणात उन्हाळी हंगाम म्हटला की डोळ्यासमोर येतात ते आंबे, काजू, फणस, जांभूळ, करवंदे, कोकम ही नैसर्गिक फळफळावळ. पूर्वी हा कोकणी मेवा चाखण्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी मंडळी कुटुंबकबिल्यासह उन्हाळी सुट्टीत गावी येत. कालौघात हे प्रमाण कमी झाले असले तरी कोकणी मेव्याची भुरळ सर्वांनाच असते. मात्र, बदलत्या हवामानाचा फटका कोकणी मेव्याला बसला आहे.

अनियमित थंडी, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, प्रचंड उष्मा यामुळे यंदा कोकणी मेव्याचे उत्पादन घटले आहे. तर अल्प उत्पादन असलेल्या हापूस आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचले आहेत. सध्या देवगड हापूसचा दर 700 ते 800 रु.डझन आहे. सहज मिळणारा रायवळ आंबाही फारसा नसल्याने चाकरमान्यांसह स्थानिकांची निराशा झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हवामान बदलांचा फटका कोकणातील फळफळावळीला बसत आहे. मुळात ऋतुचक्र बदलले आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे पावसाळ्याचे महिने मात्र गेल्या काही वर्षांपासून नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडतो. त्यानंतर मे महिन्यांपर्यंत तो अधूनमधून अवकाळी स्वरूपात पडत असतो. नोव्हेंबरपासून थंडी पडायला हवी ती जानेवारीनंतर पडते आणि उन्हाळा जूनपर्यंत पुढे सरकत आहे. या सार्‍या बदललेल्या चक्रामुळे सर्वच फळपिकांच्या उत्पादनात घट झाली आहे.

देवगडच्या हापूसची चव काही औरच. मात्र या पिकाच्या उत्पादनात गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने घट होत आहे. जेमतेम 20 ते 25 टक्केच उत्पादन हापूसचे होते आणि हंगामही लांबतो. त्यामुळे हापूस चे दर सर्वसामान्यांना परवडत नाहीत. सध्या देवगडचा हापूस 700 ते 800 रू. डझन आहे. आणखी 15 दिवस तरी हे दर खाली येणार नाहीत, असे जाणकारांचे मत आहे. बाजारात हापूसची आवक काही प्रमाणात सुरू झाली आहे. परंतू सर्वसामान्यांना दुरूनच दर्शन घ्यावे लागत आहे. रायवळ आंबे ही कसर भरून काढत असत. मात्र, यावर्षी रायवळ आंब्यांचे प्रमाणही कमी आहे. जे आहेत ते पिकायला अजून 15 दिवस जाणार आहेत. त्यामुळे यंदा आंब्याची चव चाखण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. काजू हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. काजूलाही यंदा लहरी हवामानाचा फटका बसला आणि जे उत्पादन होते, त्याला दर नसल्याने शेतकरी उत्पादक अडचणीत आले आहेत. यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सह्याद्री पट्ट्यात चक्रीवादळसदृश्य वादळ झाले. त्यामध्ये आंब्याला आलेला मोहोर आणि लागलेली फळे गळून पडली. काजू पिकाचीही मोठी हानी झाली.

Back to top button