परळी पीपल्सच्या गुंतवणूकदारांचा आक्रोश ! | पुढारी

परळी पीपल्सच्या गुंतवणूकदारांचा आक्रोश !

कैलास शिंदे

नेवासा : मोठ्या विश्वासाने नेवासा तालुक्यातील नागरिकांनी मोठ-मोठ्या रकमांच्या ठेवी परळी पीपल्स पतसंस्थेत ठेवल्या होत्या. अचानक पतसंस्थेचे तीनतेरा वाजल्याने लाखोकोटींच्या रकमांचे भवितव्य चार वर्षांपासून अंधकारमय झाले आहे. अनेक ठेविदारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा नेवून निवेदनाद्वारे आपला आक्रोश व्यक्त केला. संबंधितांवर कारवाई करून ठेवी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली. ‘परळी’मध्ये पैसे गुंतवणुकीची भूरळ पडली अन् चुना लागल्याने ‘काहींना सांगता येईना व बोलताही येईना,’ अशी गत सध्या गुंतवणूकदारांची झाली आहे.

व्यापर्‍यांनी आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा तहसीलदार व पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात दिला आहे.
नेवासा शहरात धुमधडाक्यात चार वर्षांपासून परळी पिपल्स अर्बन को-ऑफ क्रेडीट सोसायटीचे उद्घाटन करण्यात आले. अनेक नागरिक व व्यापार्‍यांना तालुक्यातील पुढारपण करणार्‍या काही तरुणांनी, पदाधिकार्‍यांनी विश्वास देऊन ठेवी ठेवण्यासाठी गळ घातली होती. त्यामुळे तालुक्यातील अनेकजण पदाधिकारी असल्याने आपल्या ठेवींना संरक्षण राहील व दोन पैसेही मिळतील, या आशेने भोळ्याभाबड्या व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी लाखोंच्या ठेवी गुंतवणूक म्हणून पतसंस्थेत ठेवल्या होत्या.

स्थानिक पातळीवर एकमेकांच्या सहकार्याने विश्वासाने व्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आज अडचणीत हीच मंडळी हातवर करत आहेत. देवू-देवूचे घोडे दामटत आहेत. ठेविदारांचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी यातील व्यापारी ठेविदारांनी शहरातील परळी पीपल्स पतसंस्था व संचालक मंडळा विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता.

नेवासा शहरातील परळी पीपल्स पतसंस्थेच्या शाखेच्या संचालक व कर्मचारी विरोधात आक्रमक आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी नेवासा शहरातील सर्वच व्यापारी, ठेवीदार व खातेदारांनी एकत्रित येत आवाज उठवला. गेल्या चार वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या या पतसंस्थेच्या संचालक मंडळांचा गैर कारभार उघड आणण्यासाठी नेवासा परिसरातील अनेक ठेवीदार व खातेदार एकत्रित आले होते. गरजवंतांच्या ठेवी पतसंस्थेत असल्याने गरजवंत खातेदारांचा बोलताना अश्रू अनावर आले. परळी पीपल्स पतसंस्थेवर गुन्हा नोंदवून योग्य ती कारवाई न झाल्यास व ठेविदाराच्या पैशासाठी योग्य ते पाऊल न उचलल्यास तीव्र आंदोलन किंवा आत्मदानाचा इशारा ठेविदारांनी निवेदनात दिला आहे.

या आंदोलनात खातेदार शशिकांतनळकांडे, अभय गुगळे, संतोष कुटे, प्रसाद लोखंडे, रिजवान सय्यद, दर्शन शिंगी, पठाण बंधू, राजेश उपाध्ये, विनोद नळकांडे, जीवनी जिक्रिया, आनंद डौले, शरद उगले, अमित विखोना, अमोल सुरोशे, डौले मेजर, सुनील डोहाळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. तहसीलदारांनी नेवाशाचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांना कारवाईचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले.

भल्याभल्यांची गुंतवणूक अन् चुना लागला!
मुलींच्या लग्नासाठी, सेवानिवृत्त शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, व्यापारी व इतर नागरिकांनी विश्वासाने मोठी गुंतवणूक ठेवींमध्ये केलेली आहे. आता, चार वर्षांपासून पैसे मिळत नसल्याने ठेविदारांची चिंता वाढली आहे. भल्याभल्यांना ‘परळी’मध्ये पैसे गुंतवणुकीची भूरळ पडली अन् चुना लागल्याने काहींना सांगता येईना व बोलताही येईना, अशी गत झाली.

व्यापार्‍यांचे उशिरा शहाणपण!
चार वर्षांपासून परळी पतसंस्था सुरू होवून काही दिवसांत नव्याचे नऊ दिवस संपले. फसवणूक होत असल्याचे लक्षात येत असल्याने काहींना कमी अधिक रक्कमही मिळाली. स्थानिक संबंध व पैसा देण्याचे आश्वासन मिळत असल्याने कोणीही पुढे येत नव्हते, आता काहीच हालचाली होत नसल्याने व्यापार्‍यांनी एकत्र येत आवाज उठवला आहे. व्यापर्‍यांना आता उशिरा शहाणपण आले, असेच म्हणावे लागेल.

Back to top button