‘सोसायटी, ग्रामपंचायत’ करणार ‘मार्केट’ जाम ! बाजार समिती निवडणूक सर्वत्र प्रतिष्ठेची | पुढारी

‘सोसायटी, ग्रामपंचायत’ करणार ‘मार्केट’ जाम ! बाजार समिती निवडणूक सर्वत्र प्रतिष्ठेची

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 14 बाजार समित्यांच्या निवडणुकांमुळे राजकारण कमालीचे तापले आहे. तालुक्यातील सर्व गावांतील ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व सहकारी सोसायट्यांचे संचालक हे मतदार असल्याने त्यांचे ‘मार्केट’ही चांगलेच वाढताना दिसत आहे. त्यातच ही निवडणूक आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ‘लिटमस टेस्ट’ म्हणून पाहिली जाणार असल्याने आजी-माजी आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी अर्ज माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे सेना असाच सामना पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी सात-सात बाजार समित्यांसाठी दि.28 आणि 30 अशा दोन दिवसांचा मतदान कार्यक्रम आहे. प्रत्येक तालुक्यात आजी-माजी आमदारांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे.

त्यामुळे राजकारणातील आर्थिक नाडी समजली जाणारी बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला जात आहे. जेवणावळीही सुरू झाल्या आहेत. वेगवेगळी प्रलोभने दिली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदार संघातील मतदारांचा ‘भाव’ आणखी वाढणार असल्याचे हे संकेत आहेत.

सहकारी सोसायटी 11; ग्रामपंचायतीच्या चार जागा!
बाजार समितीच्या एकूण 18 जागा आहेत. यामध्ये सोसायटी मतदारसंघातून सर्वसाधारण सात, महिला प्रतिनिधी दोन, विमुक्त जाती व भटक्या जमाती एक, इतर मागासवर्ग एक; ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण प्रतिनिधी दोन, अनुसूचित जाती-जमाती एक, आर्थिक दुर्बल घटक प्रतिनिधी एक अशा चार जागा; तर व्यापारी दोन आणि हमाल-मापाडी एक अशा तीन जागा आहेत. प्रत्येक मतदारसंघातील मतदार वेगवेगळे असल्याने सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदारसंघातील जागा सत्ता मिळवण्यासाठी जास्त निर्णायक ठरणार असल्याने घोडेबाजारही होणार आहे.

बिनविरोध जागा 12

नगर ः व्यापारी मतदारसंघ दोन जागा
राहाता ः व्यापारी दोन, हमाल-मापाडी एक
अकोले ः विमुक्त जाती एक, अनुसूचित जाती-जमाती एक व हमाल-मापाडी एक जागा
कोपरगाव ः विमुक्त जाती एक, अनुसूचित जाती-जमाती एक व दुर्बल घटक एक
नेवासा ः हमाल मापाडी एक जागा.

Back to top button