नाशिकच्या विकासासाठी विशेष पॅकेज – पालकमंत्री दादा भुसे | पुढारी

नाशिकच्या विकासासाठी विशेष पॅकेज - पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यानंतर नाशिकवर विशेष प्रेम आहे. २०२७ चा कुंभमेळा जिल्ह्यातील रोजगार व अन्य बाबींकरिता मुख्यमंत्री एक दिवस देणार आहेत. त्यादिवशी चर्चेतून जिल्ह्याच्या विकासावर मंथन करून विशेष पॅकेज निश्चितपणे मिळेल, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा रविवारी (दि. २) लोकार्पण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ना. भुसे बोलत होते. मुंबई व ठाण्यातील विकास झपाट्याने झाल्याने ही दोन्ही शहरे बदलली आहेत. या दोन्ही शहरांनंतर मुख्यमंत्र्यांचे नाशिकवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील विकासकामांच्या दृष्टीने एकदिवस देण्याची मागणी ना. शिंदे यांच्याकडे केली होती. ही मागणी त्यांनी मान्य केल्याचे ना. भुसे यांनी सांगितले. या संपूर्ण दिवसामध्ये आगामी कुंभमेळ्याची तयारी, बेरोजगारांच्या हाताला काम, रोजगारनिर्मिती तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास आराखड्यावर चर्चा होणार आहे. यानिमित्ताने नाशिकचा विकास अधिक जलदगतीने होईल, असा विश्वासही ना. भुसे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे. शासनाने लोकोपयोगी व विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, वर्षभरानंतर त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील, असे ना. भुसे म्हणाले. नाशिकचे शिवसेना कार्यालयाच्या माध्यामातून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करू, अशी ग्वाही ना. भुसे यांनी दिली.

पालकमंत्र्यांची ड्यूटी

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये दर १५ दिवसांनी पालकमंत्री म्हणून आपण ड्यूटी पार पाडणार असल्याचे आश्वासन ना. भुसे यांनी दिले. कार्यालयाद्वारे समाजातील गरिबातील गरीब व वंचिताला न्याय देतानाच जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, असेही ना. भुसे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मदत

राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका क्लिकवर अडीच हजार कोटींचा निधी वर्ग करण्यात आला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये मदत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर तातडीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

Back to top button