पुढारी ऑनलाईन: मध्य प्रदेशातील इंदूर येथे रामनवमी दिवशी मोठी दुर्घटना घडली. येथील एका मंदिरातील पुरातन विहिरीचे छत कोसळून ३६ भाविकांचा मृत्यू झाला. यानंतर मंदिराच्या दोन विश्वस्तांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता मनपा प्रशासनाकडून देखील मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंदूर महानगरपालिकेने दुर्घटना घडलेल्या बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराचे अवैध बांधकाम बुलडोझरच्या माध्यमातून पाडण्याची कारवाई सुरू केली आहे. (Indore temple stepwell collapse)
या कारवाई दरम्यान बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या मंदिराचे बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी महापालिकेचा मोठा कर्मचारी वर्ग व पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अवैध बांधकाम पाडण्याची कार्यवाही आज सकाळपासून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान कोणताही गोंधळ किंवा उपद्रव होऊ नये, यासाठी येथे मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी शनिवारी (दि.०३) राज्यातील भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारवर हल्लाबोल करत, या संकुलातील बेकायदा बांधकाम सात दिवसांत हटवण्याची मागणी केली होती. बेकायदा बांधकाम हटवले नाही, तर काँग्रेस उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करेल, असे काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी सांगितले होते. या दुर्घटनेत जखमीी झालेल्या भाविकांची कमलनाथ यांनी खासगी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. दरम्यान त्यांनी दुर्घटना घडलेल्या बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरालाही भेट दिली होती. यानंतर येथील मनपा प्रशासनाडून ही कारवाई करण्यात आली आहे. (Indore temple stepwell collapse)