पुणे : पडळकर कार्यकर्ता तर मी नेता : महादेव जानकर | पुढारी

पुणे : पडळकर कार्यकर्ता तर मी नेता : महादेव जानकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गोपीचंद पडळकर हा कार्यकर्ता आहे तर मी नेता आहे, त्यामुळे नेता आणि कार्यकर्त्यामधील फरक ओळखायला हवा. त्यामुळे मी मंत्रीपद मागणार नाही, मी मागणारा नाही तर देणारा आहे. भाजपला गरज वाटली तर मला मंत्री करतील, मी मात्र युती धर्म पाळणार आहे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

भाजप, बाळासाहेबांची शिवसेना व मित्र पक्षाचे कसबा पेठ पोटनिवडणुकीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख अजय भोसले आदींसह भाजप व रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार गोपीचंद पडळकर भाजपमध्ये आल्यापासून भाजप आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे का ? या प्रश्नावर उत्तर देताना जानकर यांनी पडळकर भाजपचा कार्यकर्ता आहे आणि मी रासपचा राष्ट्रीय नेता आहे, त्यामुळे गरज वाटली‌ तर भाजप मला मंत्रीपद देईल. मी मागणार नाही, मी मागणारा नाही तर देणारा नेता आहे. मी युती धर्म पाळणारा नेता आहे. त्यामुळे मी आज माझी टीम घेवून महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विजयासाठी पुण्यात आलो आहे. रासने व भाजपने मला बातामती लोकसभेच्या निवडणुकीत खडकवासल्यात चांगली मदत केली आहे. त्यामुळे रासने यांच्या विजयासाठी आम्ही आमची ताकत त्यांच्या मागे उभी करत आहोत. मात्र, महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रासप स्वबळावर लढणार असल्याचेही जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Back to top button