अमेरिकेतील जावईबापूंची दर्यापुरात धमाल; बायकोला भेटण्यासाठी अमेरिकन पोलिसवाला सातासमुद्रपार | पुढारी

अमेरिकेतील जावईबापूंची दर्यापुरात धमाल; बायकोला भेटण्यासाठी अमेरिकन पोलिसवाला सातासमुद्रपार

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : वर्षभरापूर्वी लग्न झाले असताना बायकोपासून दूर असलेले अमेरिकन पोलीस दलात असलेले अँड्र्यू रॉबिन्स हे सातासमुद्रापार अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे दाखल झाले आहेत. मूळचे अमेरिकन असलेल्या या जावईबापूंची दर्यापुरात सध्या चांगलीच धमाल सुरू आहे. अमेरिकन जावईबापूंनी दर्यापुरात झिंगाट गाण्यावर भन्नाट डान्सही केला. सध्या अमेरिकेतील जावईबापू दर्यापूरकरांच्या पाहुणचाराचा आस्वाद घेत आहेत.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रहिवासी असलेली श्रद्धा म्हस्के या तरुणीचे गेल्या वर्षी २ फेब्रुवारीला अमेरिकेकन पोलीस दलात असलेले अँड्र्यू रॉबिन्स यांच्यासोबत दर्यापुरात लग्न झाले होते. मुंबईला एका टुरिस्ट कंपनीत नोकरीला असलेल्या श्रद्धाची शहा कुटुंबीयांसोबत ओळख झाली होती. अँड्र्यू रॉबिन्स यांची भारतातील तरुणी सोबत लग्न करण्याची इच्छा असल्याचे शहा कुटुंबीयांनी सांगितले होते. त्यासाठी श्रद्धा ही चांगली जोडीदार होऊ शकते. म्हणून दोघांचीही ओळख करून दिली होती. दोघांनीही पसंती दर्शविल्यानंतर अँड्र्यू रॉबिन्स यांचे अमेरिकेत असलेले आई-वडील आणि श्रद्धा मस्के यांच्या आई वडिलांची समाज माध्यमातून ओळख करून दिल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी या लग्नाकरिता संमती दर्शविली. मात्र कोरोनामुळे दोन वर्षे त्यांना लग्न करता आले नाही. नंतर २ फेब्रुवारी २०२२ रोजी दर्यापूर येथे मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह पार पडला.

श्रद्धाचा पासपोर्ट तयार झाला मात्र विझा नसल्याने तिला रॉबिन सोबत जाता आले नाही. लग्नानंतर अँड्र्यू अमेरिकेला निघून गेला. आता लग्नाचा वाढदिवस असल्याने १ फेब्रुवारीला अँड्र्यू मुंबईत आला. तेथे श्रद्धा त्याला घ्यायला गेली होती. त्यानंतर दोघेही दर्यापुरात दाखल झाले. श्रद्धाच्या घरी दोघांनीही त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. अँड्र्यूला येथील मटन आवडत असल्याने त्याच्यासाठी रोजच मटणाचा पाहुणचार केला जात आहे. सोबत पुरणपोळी देखील त्याने मोठ्या आवडीने खाल्ल्याची माहिती श्रद्धाच्या कुटुंबीयांनी दिली. श्रद्धाच्या शाळा महाविद्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले.

हे वाचलंत का ?

Back to top button