पुढारी ऑनलाइन डेस्क : Twitter Blue : 'ट्विटर ब्ल्यू' सबस्क्रिप्शन सेवा भारतात लाँच झाली असून अँड्रॉइड आणि ios दोन्हींवर 900 रुपये प्रति महिना भरून तुमच्या खात्यावर तुम्हाला ब्ल्यू टिक मिळवता येणार आहे. तर वेबवर, त्याची किंमत फक्त 650 रुपये प्रति महिना असेल तसेच तुम्ही वार्षिक योजना निवडल्यास 566.7 प्रति महिना भरून ट्विटरची ब्ल्यू टिक सेवा मिळवता येणार आहे.
Twitter Blue : ट्विटर ब्ल्यूची सेवा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूके यासह निवडक बाजारपेठांमध्ये सुरू करण्यात आली होती. मात्र, संशयास्पद खात्यांच्या स्ट्रिंगची पडताळणी झाल्यानंतर ती मागे घेण्यात आली होती. तसेच महिनाभरात ही सुविधा भारतात सुरू होईल, असे त्यावेळी ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी सांगितले होते. तसेच भारतात ट्विटर ब्ल्यू सबस्क्रिप्शनची सुरुवात येथील मार्केटप्रमाणे वापरकर्त्यांच्या क्रयशक्तीप्रमाणे ठरवली जाईल, असेही मस्क यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आज कोणताही खूप मोठा गाजावाजा न करता ट्विटर ब्ल्यू ची सेवा भारतात लाँच करण्यात आली आहे.
कसे मिळवणार ब्ल्यू टिक सब्स्क्रिप्शन
ट्विटर ब्ल्यू टिक सब्स्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रोफाइलवर आतल्या बाजूला डावीकडून स्वाइप करून आतमध्ये जा. त्यानंतर तुम्ही सरळ सबस्क्रिप्शन विंडोवर पोहोचाल. सुविधा घेताना तुम्ही Android, iOS आणि वेब या दोन्हींवर उपलब्ध असल्याची पुष्टी करू शकता.
हे अॅडवान्स फीचर्स मिळणार
तुम्हाला ब्ल्यू टिक मिळेल
एखाद्याला रिप्लाय देताना, उल्लेख (टॅग) आणि शोध घेताना प्राधान्य मिळेल
होम टाइमलाइनमध्ये 50 टक्के कमी जाहिराती
मोठे व्हिडिओ पोस्ट करण्याची क्षमता
ट्विट संपादन, NFT प्रोफाइल चित्रे आणि 1080p व्हिडिओ अपलोड यासारख्या Twitter ब्लू लॅबच्या वैशिष्ट्यांमध्ये लवकर प्रवेश