Edu दिशा : निवेदनाच्या दाही दिशा | पुढारी

Edu दिशा : निवेदनाच्या दाही दिशा

प्रियवंदा कुलकर्णी :  तुम्हाला गप्पा मारायला आवडत असतील, तुमच्याकडे लोकांना बोलतं करण्याची कला असेल आणि तुम्हाला जरा हटके करिअर करायची इच्छा असेल तर निवेदन क्षेत्रातल्या दाही दिशा तुमच्यासाठी मोकळ्या आहेत.

आजकाल खासगी वाहिन्या, त्यांचे अनेक बक्षिस सोहळे, निरनिराळ्या वाहिन्यांनी आयोजित केलेले कार्यक्रम इतकंच काय पण शाळा कॉलेजचे कार्यक्रम, कंपन्यांनी आयोजित केलेली शिबिरे अशा असंख्य ठिकाणी आज निवेदक आणि सूत्रसंचालक यांची गरज असते. दृष्य किंवा श्राव्य, माध्यम कोणतंही असो तिथे लोकांना गुंतवून ठेवण्याची कला तुमच्याकडे असेल तर या क्षेत्रातही कारकिर्दीला भरपूर वाव आहे. प्रसारमाध्यमांमध्ये निवेदकाची एक खास जागा असते. आकाशवाणी किंवा दूरदर्शन या सरकारी आणि अगणित खासगी रेडिओ तसेच टी.व्ही. वाहिन्यांमुळे या क्षेत्राला चांगली मागणी आहे. त्यासाठी भाषेवर प्रभुत्व आणि आवाजातील माधुर्य यांची तर गरज आहेच पण जोडीला सामान्य ज्ञान आणि समयसूचकताही असायला हवी.

निवेदक म्हणून काम करणार्‍या व्यक्तीविषयी सामान्य लोकांच्या मनात नेहमी एक उत्सुकता असते. त्यांच्या आवाजाची ठेवण, बोलण्याची पद्धत ही कालांतराने लोकांना इतकी सवयीची होती की त्या आवाजाशी आपलं एक नातं तयार होतं. सुधीर गाडगीळ यांच्यासारख्या बहुश्रुत निवेदकाला तर त्यांच्या शैलीमुळे लोकप्रियता मिळाली आहे. मुलाखत देणारी व्यक्ती कितीही मोठी असो, त्याला थेट आणि मिश्किल प्रश्न विचारण्यावर त्यांचा भर असतो. अशा निवेदकांमुळे एक पायंडा पडतो. अनेक तरूण मुले असे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन या क्षेत्रात येताना दिसतात.

दृष्य माध्यमात सूत्रसंचालन करण्यात आणि रेडिओवर सूत्रसंचालन करण्यात थोडा फरक आहे. तो फरक हा माध्यमाचा आहे. रेडिओवर केवळ तुमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो तर टी.व्ही. वर तुमचं व्यक्तीमत्वही समोर येत असतं. त्यामुळे अनुषंगीक बदल करावे लागतात. पण त्यासाठी लागणारे अन्य गुण मात्र समानच आहेत. तुमचं भाषेवर प्रभुत्व हवं, लोकांशी संवाद साधण्याची कला तुमच्याकडे हवी, अनेक क्षेत्रातली जुजबी का होईना पण माहिती हवी आणि मुख्य म्हणजे प्रसंगावधान हवं. आवाज चांगला असणं, गोष्टी फुलवून सांगण्याची कला वगैरे गोष्टींनी तुम्ही या क्षेत्रात पुढे जाऊ शकता. आकाशवाणी किंवा अन्य रेडिओ वाहिन्यांवर निवेदक, वृत्त निवेदक आणि इतर संबंधित जागांसाठी वेळोवेळी जाहिराती येत असतात.

आकाशवाणीला एफ. एम. वाहिन्यांची चांगली स्पर्धा जाणवत असल्याने रेडिओ जॉकी म्हणूनही चांगली संधी उपलब्ध होऊ लागली आहे. रेडिओ जॉकी म्हणून काम करताना प्रेक्षकांची आवड, सद्य घडामोडींची जाणीव आणि आवाजावर प्रभुत्व अशा अनेक गोष्टींची सांगड घालावी लागते. टी.व्हीवर निवेदक म्हणून काम करतानाही अशा गोष्टींबरोबरच तुम्हाला व्यक्तीमत्वाकडेही लक्ष द्यावं लागेल. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्या माध्यमात काम करणार आहोत, त्याची तांत्रिक बाजू थोड्या प्रमाणात माहित असायला हवी. त्यामुळे संकलन, डबींग, मिक्सिंग अशा अनेक गोष्टींची पार्श्वभूमी माहित असणं गरजेचं आहे. अर्थात मास मिडियाशी संबंधित काही कोर्स तुम्हाला याचीही माहिती करून देत असतात. खासगी किंवा सरकारी अशा कोणत्याही माध्यमात तुम्ही हंगामी किंवा पूर्ण वेळ काम करू शकता. जागेची उपलब्धता आणि तुमची पात्रता याचा मेळ बसवून काम करायची संधी मिळते. त्यानुसार वेतन ठरवले जाते. निवेदकाच्या क्षेत्रातही तुमच्याकडे प्रासंगिक किंवा करारबद्ध काम करणे असे पर्याय असू शकतात. त्यामुळे पार्ट टाईम जॉब म्हणूनही तुम्ही याकडे पाहू शकता.

Back to top button