रायगड : सागर किनाऱ्यावर अतिउत्साह ठरतोय जीवघेणा | पुढारी

रायगड : सागर किनाऱ्यावर अतिउत्साह ठरतोय जीवघेणा

मुरूड / अलिबाग; प्रकाश सदरे, जयंत धुळप : समुद्र किनाऱ्यांच्या अनन्यसाधारण आकर्षणामुळे राज्यभरातील शालेय सहली मोठ्या प्रमाणात रायगडसह कोकणात येत असतात. त्यावेळी समुद्रात पोहायला गेल्यावर समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटना घडतात. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयाची शालेय विद्यार्थ्यांची सहल नुकतीच मुरूड तालुक्यातील काशीद बीच येथे आली होती. सोमवारी (९ जानेवारी) सकाळी ११.३० च्या सुमारास या सहलीतील सहा विद्यार्थी समुद्रात पोहण्यास गेले; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. यात दोघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे काशीद समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, काशीद, मुरूड समुद्रकिनारा, जंजिरा किल्ल्यावर पर्यटनासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. मात्र अतिउत्साह किंवा सुरक्षेबाबत पुरेशी काळजी न घेतल्याने दुर्घटना घडतात, असा आजवरचा अनुभव आहे. भरती-ओहोटीच्या वेळा लक्षात घेऊन अनेकदा स्थानिकांकडून पर्यटकांना सूचना केल्या जातात. मात्र, उत्साहाच्या भरात त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जीवावर बेतण्याचे हे प्रसंग घडतात. सन २०१६ मध्ये पुण्यातील एका महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने आपले प्राण गमवावे लागल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. काशीदमध्ये खोल समुद्रात पोहणे धोकादायक असल्याचे सूचनाफलक लावण्यात आले आहेत. गेल्या बारा वर्षांत ५० हून अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची आकडेवारी पोलिस नोंदीमध्ये आहे.

मुरूड तालुक्यातील काशीद आणि चिकणी हे दोन समुद्र किनारे सर्वांना भुरळ घालणाऱ्या अशा निसर्गसौंदर्याने नटलेले आहेत त्यामुळेच येथे सहली मोठ्या प्रमाणात येत असतात. सन २०१५ ते २०२२ या सात वर्षांच्या कालावधीत काशीद बीचवर २२ आणि चिकणी बीचवर ३ अशा २५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. काशीद समुद्रकिनारी लाईफ गार्ड आणि पोलिस तैनात आहेत. पर्यटकांना सूचना देण्यासाठी १५ माहिती फलक लावले आहेत. खोल पाण्यात जाऊ नये, भरती-ओहोटीचा अंदाज घ्यावा, असे आवाहन येथील विक्रेते सातत्याने करित असतात मात्र पर्यटकांकडून दुर्लक्ष केले जाते असे या स्थानिक विक्रेते आणि व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

रायगड जिल्हा पोलिसांनी सुचवलेल्या व अमलात आणलेल्या उपाययोजना

  • शालेय सहली येतील त्यावेळी स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तैनात कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थी यांना समुद्रकिनाऱ्याची माहिती देणे.
  •  संभाव्य धोके लक्षात आणून देऊन काळजी कोणती घ्यायची याची माहिती छापील पत्रकातून देणे
  • समुद्रातील धोकादायक टप्प्यात विद्यार्थी वा पर्यटकांना जाता येऊ नये याकरिता समुद्रात गार्डरोप लावणे
  •   भरती व ओहोटीची तसेच अन्य सूचना देण्याकरिता पब्लिक ॲड्रेस सिस्टीम सत्वर कार्यान्वित करणे
  •  ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरेसे लाईफ गार्ड तैनात ठेवणे
  •  रायगड पोलिसच्या माध्यमातून अतिरिक्त कोस्टल पेट्रोलिंग सुरू ठेवणार

मुरूड तालुक्यातील समुद्रातील दुर्दैवी घटना

  •  १९९१ : खासगी कंपनीतील ७ कामगारांचा मृत्यू
  •   २०१२ : पुण्यातील आयटी कंपनीतील २ जण बुडाले
  •   २०१४ : चेंबूर मुंबई मधील ६ व्यावसायिकांचा बुडून मृत्यू
  •  २०१६ : पुण्यातील इनामदार महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

       पर्यटकांकरिता महत्त्वाचे मुद्दे

  • समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी किनाऱ्यास येते तर ओहोटीच्या वेळी समुद्रात जाते. परिणामी ओहोटीच्या वेळी समुद्रात जाऊ नये.
  •  ओहोटीच्या वेळी पाण्याच्या ओढीने पायाखालील वाळू सरकते आणि माणूस समुद्रात खेचला जातो, हा धोका लक्षात घेणे अत्यावश्यक.
  •   स्थानिकांकडून भरती-ओहोटीबाबत माहिती घेतल्याशिवाय समुद्राच्या पाण्यात उतरू नये.
  •  समुद्रावर तैनात लाईफगार्ड व पोलिस यांच्याकडून मिळणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे

Back to top button