RTO : आरटीओच्या आणखी सात सेवा ऑनलाईन; राज्य रस्ते सुरक्षा अभियानाचा मुंबईत प्रारंभ | पुढारी

RTO : आरटीओच्या आणखी सात सेवा ऑनलाईन; राज्य रस्ते सुरक्षा अभियानाचा मुंबईत प्रारंभ

मुंबई : पुढारी वृत्तसेवा:  नागरिकांचे आरटीओमधील हेलपाटे कमी करण्यासाठी आणखी सात सेवा बुधवार, ११ जानेवारीपासून ऑनलाईन सुरू केल्या. आतापर्यंत विविध १८ सेवा ऑनलाईन सुरू करण्यात आल्या होत्या, त्यात या सात सेवांची भर पडल्याने एकूण ऑनलाईन सेवांची संख्या आता २५ झाली. या सात सेवांचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत करण्यात आले.

राज्य रस्ते सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन एनसीपीए सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर शंभुराज देसाई यांनी आपल्या भाषणात मंत्र्यांचे वाढते अपघात पाहता नागरिकांसोबतच मंत्री, आमदारांनी स्वतःला वाहतुकीच्या नियमांची शिस्त लावून रात्रीच्या वेळी चालकाला गाडी चालविण्यास जबरदस्ती करू नये, दिवसा प्रवास करण्याची सूचना केली. तसेच आपल्या मुलांना दुचाकी- चारचाकी घेऊन देताना त्यांना सर्वात आधी वाहतुकीच्या नियमांची माहिती द्यावी, पालकांनी देखील स्वतः वाहतुकीचे नियम समजून घ्यावेत, त्यासाठी आरटीओने राज्यातील शाळांमध्ये पालक सभेवेळी माहिती द्यावी, अशी सूचना देसाई यांनी दिली. याशिवाय नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी याकरिता राजकीय नेत्यांच्या सभेच्या वेळी १० ते १५ मिनिटांनी व्हिडीओ क्लिप लावावी, असे देखील आरटीओला सांगितले. राज्यातील रस्ते सुस्थितीत असणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्यात एक हजार अपघातप्रवण क्षेत्रे आहेत. त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे देखील देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्वात जास्त अपघाती मृत्यू हे भारतात होतात. देशात गेल्या वर्षभरात १ लाख ५३ हजार जणांचा विविध रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. त्यापैकी १४ हजार मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. म्हणजेच १०० अपघातांमध्ये ४२ मृत्यू राज्यात होतात. राज्यात ३ लाख किलोमीटरचे रस्ते आहेत. अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये १८ ते ४५ वयोगटातील तरुणांची संख्या जास्त आहे. याचाच अर्थ दर वर्षाला सुमारे १४ हजार कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची माहिती राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली. येत्या पाच वर्षांत राज्यातील अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

RTO : ऑनलाईन सेवेला नागरिकांचा प्रतिसाद

आरटीओतर्फे लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र, कर तसेच परवान्यासंबंधित ११५ सेवा देण्यात येतात. त्यापैकी ८६ सेवा ऑनलाईन सुरू आहेत, तर दहा सेवा आधार कार्डशी जोडल्या आहेत. या सेवांना नागरिकांनी पसंती दिली आहे. आतापर्यत या ऑनलाईन सेवेचा ४५ लाख नागरिकांनी लाभ घेतला आहे.

या सेवा आता ऑनलाईन

वाहनांकरिता विशेष परवाना, वाहनांकरिता तात्पुरता परवाना, दुय्यम योग्यता प्रमाणपत्र, दुय्यम शिकाऊ अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्तीवरील पत्ता बदलणे, कंडक्टर अनुज्ञप्तीवरील पत्ता बदलणे, धोकादायक माल वाहने चालविण्यास मान्यता.

हेही वाचा

Back to top button