कोल्‍हापूर : सरवडे येथील १४ वर्षीय शाळकरी मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू | पुढारी

कोल्‍हापूर : सरवडे येथील १४ वर्षीय शाळकरी मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू

सरवडे(कोल्‍हापूर) : पुढारी वृत्तसेवा : संदिप संजय सुतार ( वय १४) या शाळकरी मुलाचा काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी सरवडे – उंदरवाडी गावच्या हद्दीतील कालव्यात घडली.  त्याचा मृतदेह सोमवारी पहाटे आढळून आला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संदिप हा मूळचा फोंडा गावचा रहिवासी असून सरवडे येथे निवृती सुतार यांच्याकडे आजोळी राहत होता. तो येथील शिवाजीराव खोराटे विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकत होता. रविवारी सुट्टी असल्याने तो मित्रांसमवेत डोंगराच्या भैरीला दर्शनासाठी गेला होता. मित्रांनी मिळून जेवण देखील केले होते. जेवल्यानंतर परत येत असताना दुधगंगा उजव्या कालव्यात तो अंघोळीसाठी उतरला त्याला पोहता येत नसल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. तो बुडाल्याचे मित्रांच्या लक्षात आल्यानंतर सर्वांनी गावाकडे धाव घेतली व नातेवाईकांना कल्पना दिली. नातेवाईक व गावातील युवकांनी तात्काळ धाव घेऊन त्याचा कालव्यात शोध घेतला परंतु आढळला नाही. काव्याला पाणी जास्त असल्यामुळे शोध घेणे अवघड बनले. त्यानंतर काळम्मावाडी धरण अधिकार्‍यांना कळवून कालव्याचे पाणी पूर्णतः बंद करण्यात आले.

कालव्यातील पाणी पूर्ण बंद झाल्यानंतर आज पहाटे त्याचा मृतदेह आढळून आला. सरवडे येथे त्‍यांच्या आजोळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप हा हुशार व अत्यंत मनमिळावू असल्याने त्याच्या जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा 

Back to top button