बारामती: गावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला माळेगाव पोलिसांकडून अटक | पुढारी

बारामती: गावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला माळेगाव पोलिसांकडून अटक

बारामती, पुढारी वृत्तसेवा: दोन गावठी पिस्तुलासह जीवंत काडतूसे विक्रीला घेऊन आलेल्या युवकाला माळेगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली. आकाश सुरेश हजारे (वय २४, मूळ रा. शिंदेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर, सध्या रा. लकडेनगर, माळेगाव, ता. बारामती) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने सोशल मिडियावर गावठी पिस्तुलाचे फोटो व्हायरल केले होते. त्यामुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुलासह जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

पोलिस कर्मचारी विजय वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हजारे याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी ही माहिती दिली. रविवारी (दि. २५) रोजी रात्री साडे आठच्या सुमारास माळेगाव बुद्रूक येथील पीर बाबाच्या दर्ग्याजवळ ही कारवाई करण्यात आली. या घटनेत प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या दोन पिस्तुलासह काडतुसे अशी ५० हजार ३०० रुपयांची घातक शस्त्रे जप्त करण्यात आली.

हजारे हा या परिसरात पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत त्याला अटक कऱण्यात आली. त्याने ही पिस्तुले कोणाला विक्री करण्यासाठी आणली होती, याची चौकशी पोलिस करत आहेत. उपनिरीक्षक डी. आर. साळवे यांनी त्याच्याकडील पिस्तुले व काडतुसे जप्त केली.

Back to top button