मुंबई : मटणाच्या रश्शावरून पोलिसाला कोंडून मारले | पुढारी

मुंबई : मटणाच्या रश्शावरून पोलिसाला कोंडून मारले

कोपरखैरणे; पुढारी वृत्तसेवा :  जेवणासाठी गेलेला एक पोलीस कर्मचारी आणि हॉटेल चालकामध्ये मटणाच्या रश्शावरून झालेल्या वादातून हॉटेलचालकाने हॉटेलचे शटर लावून जबर मारहाण केल्याची घटना कोपरखैरणेत घडली. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

किरण साबळे असे यातील फिर्यादीचे नाव असून, ते पोलीस नाईक पदावर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. १४ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ते काही मित्रांसमवेत कोपरखैरणे, सेक्टर १४ येथील हॉटेल जगदंबामध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मटणाच्या रश्शावरून हॉटेलचालक अक्षय जाधवसोबत वाद झाला. यावेळी साबळे साध्या वेशात होते. वाद झाल्यानंतर हॉटेलचालक आणि त्याच्या तीन कामगारांनी किरण यांना मारहाण सुरू केली तसेच ते पळून जाऊ नये म्हणून हॉटेलचे शटर आतून लाऊन घेत त्यांना बेदम मारहाण केली. किरण हे हतबल झाल्यानंतर त्यांना बाहेर सोडण्यात आले.

दरम्यान, त्यांचे कुटुंबीय शेजारील शाकाहारी हॉटेलमध्ये जेवण करत असल्याने त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या जबडा आणि ओठांना जबर मार लागल्याने त्यांना पोलिसांना माहिती देता आली नाही. त्यामुळे उपचार झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेलचालक अक्षय जाधव आणि तीन अनोळखी कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली.

Back to top button