Fifa World Cup : अर्जेंटिनाने उडवला क्रोएशियाचा धुव्वा, धुमधडाक्यात फायनलमध्ये एन्ट्री | पुढारी

Fifa World Cup : अर्जेंटिनाने उडवला क्रोएशियाचा धुव्वा, धुमधडाक्यात फायनलमध्ये एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : अल्वारेज (2) आणि मेस्सीने (1) केलेल्या गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने क्रोएशियाचा विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात धुव्वा उडवला. या विजयासह अर्जेंटिनाचा संघ 6 व्यांदा स्पर्धेची अंतिम फेरीत गाठण्यात यशस्वी झाला आहे. लुसेल स्टेडियमवर झालेल्या सामन्याच्या पहील्या हाफमध्ये दोन गोलची आघाडी मिळवल्यानंतर अर्जेंटिनाने दुसऱ्या हाफमध्ये तिसरा गोल नोंदवून प्रतिस्पर्धी क्रोएशियाला सामन्यात पुनरागमनाची संधीच दिली नाही आणि सामना सहजरित्या जिंकला.

मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात मेस्सीच्या जादुई खेळीची झलक अवघ्या जगाने पुन्हा एकदा अनुभवली. त्याने 34 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 39 व्या आणि 69 व्या मिनिटाला मेस्सीच्या असिस्टवर ज्युलियन अल्वारेझने गोल डागून आघाडी तिप्पट केली.

पहिल्या हाफच्या 31 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या अल्वारेझला सहकारी खेळाडूकडून पास मिळाला. पेनल्टी बॉक्सजवळ चेंडू मिळताच त्याने चेंडू पुढे नेला. क्रोएशियाचा गोलरक्षक लिव्हकोविक त्याला रोखण्यासाठी पुढे धावत आला. दोघांची टक्कर झाली आणि ते खाली पडले. त्याचवेळी गोलपोस्टकडे जाणारा चेंडू क्रोएशियन डिफेंडरने चेंडू रोखला. पण अल्वारेजला धोकादायकरित्या पाडल्यामुळे रिफरींनी क्रोएशियन गोलकीपरला पिवळे कार्ड देत अर्जेंटिनाला पेनल्टी बहाल केली. या संधीचे सोने करत मेस्सीने 34 व्या मिनिटाला उजव्या कोपऱ्यात जोरदार फटका मारून गोल केला. हा त्याचा या विश्वचषकातील तिसरा पेनल्टी गोल ठरला. गोल्डन बूट पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सी आता फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या स्पर्धेत दोघांनी 5 गोल केले आहेत.

39 व्या मिनिटाला अल्वारेझचे आक्रमण सफल 

पाहिला गोल झाल्यानंतर मेस्सीने पुन्हा एक चमत्कार केला. 39 व्या मिनिटाला मेस्सीने हाफ वे लाईनजवळ अर्जेंटिनाच्या अल्वारेझकडे चेंडू पास केला. अल्वारेझ वाऱ्याच्या गतीने चेंडू घेऊन पुढे धावला. क्रोएशियन बचावपटूंना चकमा देत तो चेंडूसह पेनल्टी बॉक्समध्ये घुसला आणि चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवला याबरोबर अर्जेंटिनाची आघाडी दुप्पट झाली. पहिला हाफ संपेपर्यंत ही आघाडी कायम राहिली.

69 व्या मिनिटाला मेस्सी-अल्वारेझचा दुसरा गोल 

69 व्या मिनिटाला मेस्सीने हाफ वे लाईनवरून चेंडू ड्रिबल करत क्रोएशियाच्या पेनल्टी बॉक्सकडे नेला. क्रोएशियाचचा बचावपटू आपल्याकडे येत असल्याचे पाहून त्याने झटक्यात उजव्या कोपऱ्यातून पेनल्टी बॉक्सच्या आत असणाऱ्या सहकारी खेळाडू अल्वारेझकडे पास दिला. ही संधी हेरून अल्वारेझने कसलीही चूक न करता क्रोएशियाचे गोलजाळे पुन्हा भेदले. या गोलनंतर अर्जेंटिनाची आघाडी तिप्पट झाली. यानंतर सामना संपेपर्यंत मेस्सीच्या संघाने क्रोएशियाला गोल करण्याची संधी दिली नाही. त्यांचे आक्रमण परतवून लावले.

पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाचे वर्चस्व 

पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाचा वरचष्मा होता. संघाने गोलवर 5 शॉट्स मारले, त्यापैकी 2 शॉट्सचे गोलमध्ये रूपांतरही झाले. त्याचवेळी क्रोएशियाने गोलवर 4 शॉट्स मारले मात्र एकही शॉट लक्ष्यावर गेला नाही. क्रोएशियाकडे 68 % वेळ चेंडूचा ताबा होता. पण, अर्जेंटिनाने दोन मोठे काउंटर अटॅक करत पूर्वार्धात 2-0 अशी आघाडी घेतली.

एकूण सामन्याचा विचार केल्यास क्रोएशियाने सामन्यातील 61% वेळ चेंडूवर ताबा राखला. संघाने गोलवर 12 शॉट्स मारले, त्यापैकी फक्त 2 लक्ष्यावर होते. अर्जेंटिनाने या कालावधीत 9 शॉट्स मारले. यातील 7 शॉट्स लक्ष्यावर होते आणि त्यांना 3 गोल करण्यात यश आले. त्याचवेळी क्रोएशियाला एकही गोल करता आला नाही.

6 व्यांदा अंतिम फेरी गाठली 

फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अर्जेंटिनाने आपली अपराजित राहण्याची परंपरा कायम राखली. संघाने 6व्यांदा अंतिम फेरी गाठली. याआधी या संघाने पाच उपांत्य फेरी खेळून पाचही सामने जिंकले. पण या संघाने 1978 आणि 1986 मध्ये दोनदाच विश्वचषक जिंकला. त्यांनी 1978 मध्ये नेदरलँड आणि 1986 मध्ये पश्चिम जर्मनीचा पराभव केला. हा संघ शेवटचा अंतिम सामना 2014 मध्ये खेळला होता.

मेस्सी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू 

मेस्सीने आपल्या फिफा विश्वचषक कारकिर्दीत 11 गोल केले आहेत. यासह तो अर्जेंटिनाकडून विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. त्याच्यापाठोपाठ 10 गोलांसह गॅब्रिएल बतिस्तुताचा क्रमांक लागतो.

अर्जेंटिना दुसऱ्यांदा फायनलमध्ये 

मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचला आहे. सामना खेळणार आहे. शेवटच्या वेळी 2014 मध्ये त्यांच्या संघाला विजेतेपदाच्या लढतीत जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला होता.

Back to top button