Apology of Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांची जाहीर माफी; वाद थांबविण्याचे आवाहन | पुढारी

Apology of Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांची जाहीर माफी; वाद थांबविण्याचे आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उच्चव तंत्रशिक्षणमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली आहे. ‘माझ्याकडून बोलीभाषेतील शब्द अनवधानाने निघाले. यात कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. मात्र, यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर जाहीर माफी मागतो,’ असे म्हणत पाटील यांनी वाद थांबवण्याचे आवाहन (Apology of Chandrakant Patil :) केले आहे.

‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करीत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करीत आलो आहे. त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले. यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण, त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत, याचे वाईट वाटते. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये, असे मला वाटते. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी जाहीर माफी मागतो.

Apology of Chandrakant Patil : कारवाई आणि निलंबन मागे घ्यावे…

माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही, तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे, त्यांची मुक्तता करावी, ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तीही मागे घ्यावी, तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली, त्यांच्याबद्दल काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने या वादावर मी पडदा टाकत आहे. त्यामुळे आता हा वाद थांबवावा, अशी विनंती पाटील यांनी प्रसिद्धिपत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा

Back to top button