Khakee: The Bihar Chapter : नेटफ्लिक्सची वेब सीरीज… बिहार पॉलिटिक्‍स आणि एका ‘आयजी’चे निलंबन, जाणून घ्‍या नेमकं काय आहे प्रकरण | पुढारी

Khakee: The Bihar Chapter : नेटफ्लिक्सची वेब सीरीज... बिहार पॉलिटिक्‍स आणि एका 'आयजी'चे निलंबन, जाणून घ्‍या नेमकं काय आहे प्रकरण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एकेकाळी ‘जंगलराज’ असे बिरुद मिरविणारे बिहार राज्‍य सध्‍या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. कारणही थोडे वेगळे आहे. OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर एका आयपीएस अधिकार्‍यांच्‍या पुस्‍तकांवर आधारीत एक वेबसीरीज रिलीज होते.. मात्र, वेबसीरीज रिलीज होताच लेखक असणारा आयपीएस अधिका-याचेच काही दिवसांत निलंबन होते. यानंतर यामागे असणार्‍या राजकारणाची बिहारमध्‍ये जोरदार चर्चा सुरू होते. जाणून घेवूया, सध्‍या बिहारमध्‍ये गाजत असलेल्या ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ ( Khakee: The Bihar Chapter) आणि आयपीएस लोढा यांच्‍या निलंबनाविषयी…

Khakee : The Bihar Chapter: नेमकं प्रकरण काय?

‘ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ ही सात भागाची वेबसीरीज नुकतीच रीलीज झाली. आयपीएस अमित लोढा यांच्‍या २०१८ मध्‍ये प्रकाशित झालेल्‍या ‘Bihar Diaries: The True Story of How Bihar’s Most Dangerous Criminal Was Caught.’ या पुस्‍तकावर ही वेबसीरीज आहे. जबाबदारीच्‍या पदावर असताना आर्थिक फायद्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करत नेटफ्‍लिक्‍सशी व्‍यावसायिक करार केल्‍याचा ठपका अमित लोढा यांच्‍यावर ठेवण्‍यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध कथित भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्‍यानंतर त्‍यांना निलंबित करण्‍यात आले आहे.

कोण आहेत अमित लोढा ?

अमित लोढा हे मुळचे राजस्‍थानचे. त्‍यांचे आजोबा आयएएस अधिकारी होते. आयआयटीमध्‍ये अभियांत्रिकी पदवी घेतली. पदवीनंतर त्‍यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएसएसी) परीक्षा दिली. १९९८ मध्‍ये ते आयपीएस झाले. अवघ्‍या २५व्‍या वर्षी ते नालंदाचे पोलीस अधीक्षक झाले होते. बिहारमधील महतो टोळीचा त्‍यांनी बंदोबस्‍त केल्‍याने त्‍यांची लोकप्रियेता राज्‍यभर पसरली होती.

अमित लोंढा लिखित पुस्‍तकावर वेबसीरीज

अमित लोढा यांनी २०१८ मध्‍ये प्रकाशित झालेल्‍या Bihar Diaries: The True Story of How Bihar’s Most Dangerous Criminal Was Caught.’ या पुस्‍तकात बिहारमधील सर्वात धोकादायक गुन्‍हेगाराला कसे जेरबंद केले, याची कहाणी सांगितली आहे. या वेबसीरीजमधील खलनायक चंदन महतो (ही भूमिका अभिनेता अविनाश तिवारीने साकारली आहे) त्‍याचा म्‍होरक्‍या अशोक महतो आणि शार्पशूटर पिंटू महतोवर आधारीत वेबसीरीज आहे. ९०च्‍या दशकामध्‍ये महतो टोळीची दहशत ही बिहारमधील नवादा, शेखपुरा आणि नालंदा जिल्‍ह्यात होती. या वेळी बिहारची सत्ता ही लालूप्रसाद यादव यांच्‍या राष्‍ट्रीय जनता दल पक्षाकडे होती. आणि मुख्‍यमंत्री होत्‍या लालूप्रसाद यादव यांच्‍या पत्‍नी राबडी देवी.

या वेबसीरीजमध्‍ये बिहारमधील तत्‍कालीन जातीय संघर्ष, गुन्‍हेगारी टोळ्या, भ्रष्‍टाचार आणि विविध घोटाळ्यांमुळे बिहारचे जंगलराज असे वर्णन आहे. याच काळात जातीय संघर्षात नवाडा गावात शेकडो लोकांचा मृत्‍यू झाला होता. शेखपुरा येथे राष्‍ट्रीय जनता दलाच्‍या (आरजेडी) तब्‍बल ९ कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राजो सिंग आणि त्‍याचा आमदार मुलगा संजय सिंग या दोघांना आरोपी करण्‍यात आले होते. २००५ मध्ये अशोक महतो टोळीने , राजो सिंग यांची गोळ्या घालून हत्‍या केली. २००१ मध्‍ये अमित लोढा यांनी २००६ मध्ये पिंटू महतो आणि अशोक महतो यांना जेरबंद केले. याचीच कथा या वेबसीरीजमध्‍ये आहे.

Khakee: The Bihar Chapter : लोढांच्‍या निलंबनामागील राजकारण

पोलिसांसमोर कबुलीजबाब देताना महतो टोळीचा म्‍होरक्‍या अशोक महतो याने २००५ मध्‍ये बिहारचे मुख्यमंत्री झालेल्या नितीश कुमार यांच्यासह जेडीयूच्या काही नेत्यांशी आपले संबंध असल्याचे सांगितले होते. नीरज पांडे यांनी तयार केलेली नेटफ्लिक्स मालिका अशा वेळी आली आहे की, बिहारमध्‍ये नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपला सोडचिठ्ठी देत आरजेडीसोबत आघाडी केली आहे. महतो टोळीने आरजेडी कार्यकर्त्यांसह अनेक मागासवर्गीय लोकांच्या हत्येचा बदला घेतल्याचे दिसले. यामुळे मागसवर्गीयांमध्‍ये अशोक आणि पिंटू हिरो बनले होते. आता याच महतो बंधुंना ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ या दोघांना खलनायक दाखविण्‍यात आल्‍याने राज्‍य सरकारची कोंडी झाल्‍याचे मानले जात आहे. राजो सिंग हत्‍याप्रकरणी अशोक आणि पिंटू हे दोघेही निर्दोष सुटले आहेत. त्‍यामुळेच आता ही वेबसीरिज प्रदर्शित झाल्‍यानंतर अमित लोढा यांच्‍यावरच निलंबनाची कारवाई करण्‍यात आल्‍याची चर्चा बिहारच्‍या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोढा यांच्‍यावर ७ डिसेंबर रोजी भ्रष्‍टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्‍हा दाखला करण्‍यात आला आहे. या प्रकरणी त्‍यांना निलंबितही करण्‍यात आले. लोढा यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा पोर्ट्रेट भेट देत असल्‍याचा फोटो शेअर करत पोस्ट ट्विट केली. यामध्‍ये त्‍यांनी म्‍हटलं आहे की, जेव्‍हा बिहार पोलीस कर्मचार्‍याचा मुलगा तुम्‍हाला प्रेम आणि आपुलकी देतो, तेव्हा कोणत्याही संकटाला तोंड देण्याचे मोठे सामर्थ्य मिळते. खूप खूप धन्यवाद!!.”

 

Back to top button