पुणे : आगीत अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका | पुढारी

पुणे : आगीत अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

पुणे : कोथरुड, पौड रोड येथील आशिष गार्डन जवळ, प्रभा को ऑप सोसायटीत दुसऱ्या मजल्यावर आज पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची वर्दी अग्निशमन दलाला मिळताच कोथरुड अग्निशमन केंद्र येथील वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच तीन मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने खिडकीमधून आगीच्या ज्वाला बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले.

त्याचवेळी त्या आग लागलेल्या सदनिकेमध्ये दोन जण अडकल्याची माहिती मिळताच जवानांनी होज पाईप घेऊन वर जाऊन एकीकडे पाण्याचा मारा सुरू केला. तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर व जवान नितिन घुले यांनी तातडीने  खोलीत अडकलेला एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थीनी यांना सुखरुप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी आणून त्यांचा जीव वाचविला. जवानांनी जेट स्प्रे वापर करुन पाणी मारत सुमारे दहा मिनिटात पुर्ण आग विझवली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

या कामगिरीत कोथरुड अग्निशमन केंद्र अधिकारी गजानन पाथ्रुडकर, वाहनचालक रमेश गायकवाड, जवान नितिन घुले, संजय महाले, शिवाजी कोंढरे, वैभव आवरगंड यांनी सहभाग घेतला. सदर विद्यार्थ्यांनी अग्निशमन दल वेळेत आल्याने आम्ही सुखरुप बाहेर आलो याबद्दल दलाचे आभार मानले.

Back to top button