Dev Diwali : काशीत देव दिवाळीनिमित्त हॉटेल्सचा दिवसाचा दर होता 1 लाख रुपये, हॉस्पिटॅलिटी उद्योगाला मिळाला बूस्टर डोस | पुढारी

Dev Diwali : काशीत देव दिवाळीनिमित्त हॉटेल्सचा दिवसाचा दर होता 1 लाख रुपये, हॉस्पिटॅलिटी उद्योगाला मिळाला बूस्टर डोस

पुढारी ऑनलाइन डेस्क : Dev Diwali : देव दिवाळीनिमित्त लक्षावधी दिव्यांनी जसा गंगेचा घाट उजळाला तसेच हॉस्पिटॅलिटी उद्योगातील हॉटेल्स, बोट आदि उद्योगांनाही लक्षावधी रुपयांच्या नफ्याचा चांगलाच बूस्टर डोस मिळाला. कारण देव दिवाळीनिमित्त काशी-वाराणसीला जवळपास 12 लाख लोकांनी भेट दिली. तर हॉटेल्स आणि बोट्सचे दर दिवसाला एक लाखाच्या पलिकडे होते.

Dev Diwali : कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी काशी-वाराणसीत देव दिवाळी साजरी केली जाते. यावेळी संपूर्ण गंगेचा घाट लक्षावधी दिव्यांनी उजळलेला असतो. तर गंगेत सोडलेल्या दिव्यांमुळे पाण्यातील काशीतील देव दिवाळी उत्सव हा डोळ्यांचे पारणे फेडणारा नेत्रदीपक उत्सव असतो. या सारखा नयनरम्य सोहळा दुसरा नाही. हा सुंदर सोहळा याची देही याची डोळा पाहावा यासाठी अनेक लोक देव दिवाळी निमित्त काशी-वाराणसीला भेट देतात. गेली दोन वर्षे कोविड 19 मुळे हा सोहळा पार पडला नाही. त्यामुळे यावर्षी लाखो लोकांनी इथे भेट दिली. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी परदेशी पर्यटकांनीही मोठ्या प्रमाणात भेट दिली. त्यामुळे यावर्षी हॉस्पिटॅलिटी उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली.

Dev Diwali : टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतची बातमी दिली आहे. टाईम्सच्या वृत्तानुसार, सोमवारी हॉटेल्सचे एक दिवसाचे दर तब्बल 1 लाख रुपयांच्या पलिकडे गेले होते. काशीतील गंगेच्या घाटापासून जवळ असलेल्या हॉटेल्सच्या दरात तब्बल 300 टक्के वाढ नोंदवली गेली. हॉटेल्सचे सरासरी दर 10 हजार ते 12 हजार होते. तर काही हॉटेल्सचे दर 30 ते 35 हजार दिवसाला होते. तर काही हॉटेल्सचे दर हे तब्बल एक लाख रुपयांपर्यंत पोहोचले होते.

हॉटेल व्यतिरिक्त बोट उद्योगांना देखिल देव दिवाळी मोठ्या प्रमाणात पावली. बाजरा/बाजरी (मोठ्या बोटींना तिथे त्याला बाजरा किंवा बाजरी म्हणतात) त्यांचे काही तासांचे दर 5000 पासून सुरू होऊन 1.50 लाख रुपयांपर्यंत पोहोचले होते. बोटीतून गंगेचा हा नयनरम्य सोहळा पाहणे खरेच खूप अद्भूत असते.

Dev Diwali : बनारस हॉटेल्स असोसिएशनचे मेंबर गोकुळ शर्मा यांनी टीओआयला दिलेल्या माहितीनुसार ज्या हॉटेल्स गंगेच्या घाटापासून लांब आहेत त्यांचे दर देखिल 50 टक्क्यांनी वाढले होते. दिवसाला ते 2000 ते 8000 इतका दर आकारत होते.

तर शहरातील एक टूर ऑपरेटर प्रदीप चौरसिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान लहान बोट्स ज्यामध्ये आठ पॅसेंजरचीच क्षमता असते. त्यांनी देखिल तब्बल 25000 रुपये चार्ज केले. त्यांचे नेहमीचे दर 500 ते 800 रुपये सामान्य दर असतात. त्यामुळे यंदाच्या देव दिवाळीनिमित्त हॉस्पिटॅलिटी उद्याोगाला मोठ्या प्रमाणात बूस्टर डोस मिळाला.

Back to top button