सात वर्षांत केवळ तिकिटासाठी झाली उदंड पक्षांतरे! | पुढारी

सात वर्षांत केवळ तिकिटासाठी झाली उदंड पक्षांतरे!

मुंबई; जयंत होवाळ : आयाराम आणि गयाराम संस्कृतीमुळे देशाच्या राजकारणात नेहमीच उलथापालथ सुरू असते. लोकसभा निवडणुका असोत की , विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुका असोत, की पोटनिवडणुका असोत…तिकीट मिळवण्यासाठी किंवा दुसर्‍या पक्षात प्रवेश करण्याची प्रक्रिया सतत सुरू असल्याचे दिसते.

2014 ते 2021 या कालावधीत 1133 उमेदवार, खासदार आणि आमदारांनी केवळ तिकिटासाठी स्वपक्षाला रामराम ठोकला आहे. यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे उमेदवार, खासदार आणि आमदारांचा आलेख सर्वात चढता राहिला आहे. 222 उमेदवारांनी काँग्रेसला हात दाखवून अन्य पक्षांची वाट धरली आहे.

काँग्रेसच्या 117 आमदार आणि खासदारांनी पक्षाकडे पाठ फिरवली आहे. काँग्रेसखालोखाल बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांची संख्या आहे. या पक्षाच्या 153 उमेदवारांनी पक्ष सोडला आहे. या उमेदवारांनी तिकीट मिळवण्यासाठी अन्य पक्षांची वाट धरली आहे. मात्र अन्य पक्षात गेलेल्या आमदार- खासदारांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. या पक्षाचे 20 आमदार – खासदार अन्य पक्षांच्या तंबूत गेले आहेत.
सध्या देशातील सर्वात बलाढ्य पक्ष असलेला भाजप तिसर्‍या क्रमांकावर आहे. या पक्षाच्या 111 उमेदवारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. भाजपच्या 33 आमदार – खासदारांनी अन्य पक्षाशी घरोबा केला आहे.

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलेच खिंडार पडले होते. विजयाची खात्री नसल्याने किंवा अन्य कारणास्तव राष्ट्रवादीच्या अनेक मातब्बर नेत्यांनी पक्ष सोडला होता. ही पडझड थांबवताना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला बरीच यातायात करावी लागली होती. या पडझडीनंतरही पक्ष महाराष्ट्रात सत्तेत वाटेकरी आहे. 2014 ते 2021 या कालावधीत या पक्षाच्या 52 उमेदवारांनी पक्षाचे घड्याळ मनगटावरून काढून टाकले आहे. यात 25 आमदार – खासदारांचा समावेश आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. देशातील लोकसभा, राज्यसभा निवडणुका, पोटनिवडनुका तसेच विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे ही संस्था सातत्याने विश्लेषण करत असते आणि त्या संदर्भातील अहवाल प्रकाशित करते.

2014 ते 2021 या कालावधीत लहान- मोठ्या पक्षांच्या मिळून 1133 उमेदवारांनी स्वपक्ष सोडून अन्य पक्षांशी संधान साधले आहे. यात 500 आमदार – खासदारांचा समावेश आहे.

विविध पक्षांच्या 253 उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात 173 आमदार-खासदारांचा समावेश आहे. काँग्रेसमध्ये 115 उमेदवारांनी आसरा घेतला आहे. यात 61 आमदार – खासदारांचा समावेश आहे. 41 उमेदवारांनी राष्ट्रवादीवर विश्वास दाखवला आहे. आठ आमदार – खासदार या पक्षाच्या तंबूत गेले आहेत. बहुजन समाज पक्षाकडे 65 उमेदवार आकृष्ट झाले आहेत. 12 आमदार – खासदारांनी बसपवर विश्वास दाखवला.

का होते पक्षांतर ?

राजकीय पक्षांच्या नीतीमूल्याचा झालेला र्‍हास,सत्तेचा आणि धनशक्तीचा वाढता वापर, धनशक्ती व दंडशक्तीची हातमिळवणी, विश्वासार्ह पक्ष नेतृत्वाची वानवा, पक्षशिस्तीचा अभाव, सत्तेचा दुरुपयोग, सत्तेचे आकर्षण, विरोधी पक्षात फार काळ न थांबण्याची मानसिकता, प्रामाणिकपणाचा अभाव, पक्षावरची आटलेली निष्ठा आदी मुख्य कारणे पक्षांतरामागे आहेत, असे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

Back to top button