परभणी : ताडकळस परिसरात जोरदार पावसामुळे खरीप पिकांच्या उत्‍पादणात घट | पुढारी

परभणी : ताडकळस परिसरात जोरदार पावसामुळे खरीप पिकांच्या उत्‍पादणात घट

परभणी ; पुढारी वृत्‍तसेवा ताडकळस परिसरातील शिवारात जोरदार पावसामुळे खरिपातील काढणीला आलेले सोयाबीन, वेचनिस आलेला कापूस तसेच मोसंबी फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांवर पेरणी पासून काढणी पर्यंत पेरणी, कीडनियंत्रण, संगोपन, कापणी यावर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. परंतु त्यातच फुलवरा अवस्थेतच जवळपास 20-25 दिवसांचा खंड पडला. त्यामुळे उत्तपादनात मोठी घट झाली. पुन्हा सोयाबीन पिकाची ऐन कापणी चालू असतानाच व कापूस बोंड फुटून वेचणीला आले असतानाच जोरदार झालेल्या पावसाने सोयाबीन पिकाला झोडपले. तर कापूस बोंडातील सरकीला मोड फुटले. पावसाचा मोठा खंड तसेच कापणीत पावसाने झोडपले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हाताला आलेले पीक मोठा खर्च करून म्हणावे तसे पदरात पडले तर नाहीच परंतू शेत शिवार तनाने व अंकुर फुटलेल्या सोयाबीनने गर्द हिरवी गार झाली. शेतकरी आधीच संकटात असताना रब्बी हंगामातील पेरणी चालू झाली आहे. परंतु शेतात वापसा होत नाही. तणाने व्यापलेले शेत दुरुस्ती करून रब्बी हंगामाची पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. परंतु जोरदार झालेल्या पावसाने हाताला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्याच्या पदरी म्हणावे तसे उत्त्पन पडणार नसल्याचे दिसते. पिकांवर पेरणी पासून काढणी पर्यंत मोठा खर्च झाला. त्यातच सोयाबीन कापणी चालू असताना झालेल्या पावसामुळे मजुरांचे सर्व हट्ट पुरवावे लागले. हे सर्व करून ही निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वर्षाचे आर्थिक गणितही कोलमडले.

सध्या रब्बी पेरणीचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतातील कामाची लगबग मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे पहावयास मिळते. परंतु अजूनही शेतातील तणाचा बंदोबस्त होत नाही. त्यामुळे बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा वापर शेतकरी करत आहेत. यामुळे रब्बी पेरणी लांबण्याची चिन्हे दिसत आहे. त्यातच खरिपातील पिकांवर झालेला मोठ्या खर्चाचा बोजा कमी झाला नाही. त्यातच संपूर्ण नुकसान होऊन ही शासनाकडून मदतीचे आणखीन कोणतेही ठोस आश्वासन मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत असतानाच हिरवेगार झालेले शेत कसे दुरुस्त करावे व रब्बी पिकांची पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. यामुळे तात्काळ पीकविमा मंजूर करावा व शासनाची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

पेरणी नंतर पिकाला फुले लागण्याच्या अवस्थेत पावसाचा मोठा खंड पडला. त्यातून कसेबसे पीक वाचले तर सोयाबीन कापणी चालू असतानाच रोजच पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे मोठे नुकसान झाले. यातून उत्त्पादणात मोठी घट झाली. पिकावर झालेला महागडा खर्च निघणे मुश्किल झाले. आत्ता रबी पेरणीला शेत दुरुस्त होत नसल्याने दुहेरी संकट उभे आहे. त्यामुळे तात्काळ पीक विमा मंजूर करून शासनाने भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.

हेही वाचा :  

Back to top button