मी बोअर झालोय, मला गाणे म्हणून दाखव; मंत्रालयातील अधिकार्याची सहकारी महिलेला लज्जास्पद वागणूक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मला बरे वाटत नाही. मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव, अशी लज्जास्पद मागणी मंत्रालयातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये अवर सचिव असलेल्या एका अधिकार्याने उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकार्याकडे केली आहे.
हा प्रकार घडला तेव्हा याच विभागाचे उपसचिवदेखील त्या केबिनमध्ये होते. त्यांच्यावरही कडक कार्यवाही करावी, अशी सूचना विधान परिषद पसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 18 ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला असून या महिला अधिकार्यांनी संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे तक्रार अर्ज दिलेला आहे. मात्र, अद्याप तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. संबंधित महिला अधिकार्यांकडून डॉ. गोर्हे यांनी माहिती घेतली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत अवर सचिव आणि उपसचिवांना तात्पुरते कार्यमुक्त करावे, असे निर्देशही गोर्हे यांनी दिले आहेत.