रायगड: आम्ही दुसऱ्याचा बाप आपला म्हणत नाही; प्रमोद घोसाळकरांचा सुनिल तटकरेंना टोला | पुढारी

रायगड: आम्ही दुसऱ्याचा बाप आपला म्हणत नाही; प्रमोद घोसाळकरांचा सुनिल तटकरेंना टोला

म्हसळा; पुढारी वृत्तसेवा: जलजीवन मिशन योजनेच्या नळपाणी योजनांचे भूमिपूजन करण्याचे काम खासदार सुनिल तटकरे करीत आहेत. परंतु राज्यात शिंदे – फडणवीस यांचे सरकार असून आमची सत्ता आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या ज्या योजना मंजूर होतात. त्या आमच्या सरकारच्या माध्यमातून होतात. त्यामुळे त्या योजनांचे भूमिपूजन आम्हीच करणार आहोत. दुसऱ्याच्या बापाला आम्ही आपला बाप म्हणत नाही, अशी टीका शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी खासदार सुनिल तटकरे यांच्यावर केली. बुधवारी (दि.19) म्हसळा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्रीवर्धन मतदारसंघात खासदार सुनिल तटकरे आणि माजी पालकमंत्री आदिती तटकरे विकासकामांवरून लोकांची दिशाभूल करत आहेत. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेल्या कामांना प्रशासकीय मान्यतेचे पत्र नाही. तरीही कोळे, कोंझरी, तळवडे आदी गावात २१ ऑक्टोबररोजी विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आले आहेत. केवळ पक्ष कार्यकर्त्याला आणि ठेकेदाराला खुश करण्यासाठी त्यांचा आटापीटा सुरु आहे. विकासकामांच्या आड आम्ही येणार नाही. लोकहिताची कामे झाली पाहिजेत. पण खासदर आणि माजी पालकमंत्री यांनी राजकरण करू नये.

केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामांमध्ये श्रीवर्धन मतदारसंघात श्रेय घेण्यासाठी तटकरे यांचे प्रयत्न आहेत. मागील अडीच वर्षाचे कालावधीत राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यांनी शिवसेनेच्या विकासकामांत अन्याय केला. आम्हाला खूप त्रास दिला. खासदार सुनिल तटकरे, आदिती तटकरे यांचा आम्हीच विकास करू शकतो, पदावर असो वा नसो आम्हालाच विकास करता येतो, असा भ्रम झाला आहे. परंतु हे चुकीचे आहे, असे घोसाळकर म्हणाले.

यावेळी मतदारसंघ संपर्क प्रमुख सचिन पाटेकर, म्हसळा तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, उपतालुका प्रमुख प्रविण बनकर, तालुका संपर्क प्रमुख अमोल पेंढारी, तालुका संघटक मंगेश शिगवण, सहसंपर्क प्रमुख बबन वाजे, पाभरे विभाग प्रमुख दिपेश जाधव, उपविभाग प्रमुख अरविंद शिंदे, वरवठणे विभागप्रमुख नामदेव घुमकर, अल्पसंख्याक तालुका प्रमुख इम्रान काझी, अल्पसंख्याक उपतालुका प्रमुख सलाम हजवाने, शहरप्रमुख अमर करंबे, शांताराम कोबनाक, सुरेश लोनशिकर, प्रवीण तांबे, मधुकर गायकर, विजय लोनशिकर आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button