पुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया | पुढारी

पुणे: सरदार पटेल रुग्णालयाचे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंघन’, दोन वर्षानंतर केली मोठी पहिली शस्त्रक्रिया

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह दोन वर्षापूर्वी जळाला होता. तेव्हापासून शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद होत्या. सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून मॉडेल शस्त्रक्रियागृह उभारण्यात आले. मात्र, उद्घाटन होऊनही केवळ पंधरा लाखांच्या निधी अभावी तीन महिन्यांपासून शस्त्रक्रिया बंदच होत्या. मंगळवारी पहिली शस्त्रक्रिया करत रुग्णालयाने दसर्‍याच्या पूर्वसंध्येला ’सीमोल्लंन’ केले आहे. रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उषा तपासे यांनी ही माहिती दिली. यावेळी डॉ.उदय भुजबळ,डॉ समीर भुजबळ उपस्थित होते.

रुग्णालयाच्या शस्त्रक्रियागृहाला सप्टेंबर 2020 मध्ये आग लागली होती. तेव्हापासून शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद होत्या. परिणामी रुग्णांना शस्त्रक्रियांसाठी खासगी किंवा इतर शासकीय रुग्णालयात पाठवले जात होते. ही बाब लक्षात घेऊन सायबेज आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या नितू नथानी यांनी सीएसआरअंतर्गत एक कोटी 62 लाख रुपये खर्च करुन रुग्णालयात मॉडेल शस्त्रक्रियागृह उभारले. मान्यवरांच्या हस्ते त्याचे लोकार्पणही 1 जुलैला झाले. परंतु शस्त्रक्रिये दरम्यान वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी यंत्रसामग्री बसवणे आवश्यक होते. त्यासाठी सुमारे 15 लाख रुपयांचा निधी हवा होता. परंतु तो निधी बोर्ड प्रशासनाने न दिल्याने शस्त्रक्रिया रखडल्या होत्या.

दोन वर्षांच्या कालखंडानंतर मंगळवारी गर्भाशय काढण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह अत्याधुनिक असून, त्यामध्ये लहान, मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातील. दररोज 8 ते 10 शस्त्रक्रिया करता येतील. आजच्या शस्त्रक्रियेमुळे काही साधनांची गरज लक्षात आली, असून, ते सामाजिक दायित्व निधीतून मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे डॉ. तपासे यांनी सांगितले.

महात्मा फुले आरोग्य योजनेत उपचार

सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत योजनेतून शस्त्रक्रिया व इतर उपचार केले जात आहेत. या योजनातंर्गत डोळे, कान, नाक, घसा, पोटांचे विकार, मूत्रपिंड, मणक्याचे आजार गर्भाशयाची पिशवी काढणे ब्रेस्ट गाठ, हर्निया, अपेंडिक्स अशा गंभीर आजारांवर शस्त्रक्रियांसह अन्य उपचार केले जातील, अशी माहिती डॉ. महेश दळवी यांनी दिली.

Back to top button